नगरसेवकांचे आव्हान नेमके कुणाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 11:17 PM2019-01-27T23:17:03+5:302019-01-27T23:18:34+5:30
मीरारोड-भाईंदर महापालिकेतील भाजपाचे सार्वभौम नेते नरेंद्र मेहता यांचा नगरसेवकांवर वचक आहे. मात्र दोन-तीन नगरसेवकांनी अलीकडेच महापौर डिंपल मेहता यांनी लक्ष्य करुन अप्रत्यक्षपणे नरेंद्र मेहता यांच्या कार्यशैलीला आव्हान दिले, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
- धीरज परब, मीरा-भाईंदर
मीरारोड-भाईंदर महापालिकेतील भाजपाचे सार्वभौम नेते नरेंद्र मेहता यांचा नगरसेवकांवर वचक आहे. मात्र दोन-तीन नगरसेवकांनी अलीकडेच महापौर डिंपल मेहता यांनी लक्ष्य करुन अप्रत्यक्षपणे नरेंद्र मेहता यांच्या कार्यशैलीला आव्हान दिले, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले आणि मीरा भाईंदर महापालिकेवर एकछत्री अंमल ठेवणारे भाजपा आ. नरेंद्र मेहता यांच्या विरोधात काही ज्येष्ठ कार्यकर्ते उघडपणे उभे ठाकले असतानाच भाजपा नगरसेवकांनीही दंड थोपटले आहेत. या नगरसेवकांनी थेट मेहतांचा नामोल्लेख टाळत महापौरांसह एकुणच कारभारावर टीकेची झोड उठवल्याने अंतर्गत असंतोष चव्हाट्यावर आला. या नगरसेवकांना भाजपातील नाराज नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचे समर्थन मिळू लागले आहे. त्याचवेळी श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांनी शहरातील गुंडगिरी व लुटमार मोडून काढण्याचा निर्धार व्यक्त करीत थेट मेहतांच्या वर्चस्वालाच आव्हान दिले. मीरा भाईंदरमध्ये एकहाती सत्ता मिळवणाºया भाजपाच्या कारभाराविरुद्ध वाढत्या असंतोषाचा भडका येत्या काळात उडाला तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे भाजपा नेतृत्वाला स्वत:च्या कार्यपध्दतीमध्ये सुधारणा करावी, अशी अपेक्षा केली तर ती चूक नाही.
ज्येष्ठ नगरसेवक मुन्ना उर्फ श्रीप्रकाश सिंग व अशोक तिवारी यांनी महासभा संपल्यावर सभागृहातच ठाण मांडत आपला संताप व्यक्त केला. स्वच्छता सर्वेक्षणातील विजेत्या प्रभागांची नावे आश्वासन देऊनही आयुक्त बालाजी खतगांवकर यांनी जाहीर केली नाहीत व महापौर डिंपल मेहता सभा तहकूब करुन निघून गेल्याने सिंग-तिवारी यांच्या संतापाचा उद्रेक झाला. आयुक्तांशी त्यांची जोरदार बाचाबाची झाली. स्वच्छता सर्वेक्षणाचा निर्णय जाहीर न करण्याचे कारण हे केवळ निमित्त आहे. या नगरसेवकांनी सेटींग, अंडरस्टँडींग होत असल्याचे थेट आरोप करतानाच कामे होत नाहीत, समस्या वाढल्या आहेत, असा तक्रारींचा पाढा वाचला.
दोन्ही नगरसेवकांनी मांडलेल्या व्यथा व संताप हा अन्य नगरसेवक, पदाधिकाºयांना पटणारा होता. नगरसेविका वंदना पाटील यांनीही आम्ही काय सभागृहात फक्त ठरावावर हात वर करायचा काय, असा सवाल करीत नगरसेवकांच्या मनातील खदखद बोलून दाखवली. भाजपाच्या अन्य नगरसेवकांनी त्यांना अडवले नाही. आक्रमक भाषा बोलून या नगरसेवकांनी स्थानिक प्रमुखांसह त्यांच्या गोतावळ््यातील नगरसेवकांनाही जुमानले नाही. नेतृत्वाची ‘जी हुजुरी’ करुन स्वत:ची पोळी भाजून घेणाºयांबाबत संताप व्यक्त केला.
भाजपाचे ६१ नगरसेवक असले तरी निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक नाराज असल्याचे बोलले जाते. जे मेहतांच्या मेहेरबानीवर निवडून आलेत त्यांना मूग गिळून गप्प बसण्याशिवाय पर्याय नाही. पण जे स्वबळावर निवडून आले आहेत त्यातले बहुतांश नगरसेवक आपला बाणा गहाण ठेवण्यास तयार नाहीत.
पालिकेतले पान मेहतांखेरीज हलत नाही. टेंडरपासून टाचणी कुठे ठेवायची येथपर्यंत खडानखडा माहिती ठेवली जाते. कोणाच्या प्रभागात काय व कुठे काम करायचे, महासभेत कोणी काय बोलायचे याचे निर्णय त्यांच्याकडून घेतले जातात. कोणाची विरोधात ब्र काढायची हिंम्मत नसते. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी उठवलेल्या आवाजाकडे पाहिले पाहिजे. माजी महापौर गीता जैन यांच्यासह काही ज्येष्ठ भाजपा कार्यकर्त्यांनी आ. मेहतांविरोधात आघाडी उघडली आहे. थेट वर्मी लागतील असे टीकेचे बाण त्यांच्याकडून सुटत आहेत.
त्यातच श्रमजीवीसारख्या लढाऊ संघटनेचे प्रमुख विवेक पंडित यांनी थेट भाजपाला पाठींबा द्यायचा की नाही याचा विचार करावा लागेल, असा आक्रमक पावित्रा घेतला. पंडित यांनी दिलेला इशारा मेहतांना दुर्लक्षून चालणार नाही. पंडित यांनी पालिकेतील व शहरातील सार्वजनिक वाहतुकीशी संबंधित विविध संघटना बांधण्यास घेतल्या आहेत. त्यामुळे पंडित यांनी पालिके विरोधात आक्रमकपणे आघाडी उघडली तर दुहेरी फटका बसु शकतो.