अवघ्या बारा वर्षांत पुलाच्या दुरवस्थेला जबाबदार कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 03:56 AM2018-09-17T03:56:46+5:302018-09-17T03:57:20+5:30
शहरातील राजीव गांधी स्मृती उड्डाणपुलाच्या स्लॅबचा काही भाग कोसळून भगदाड पडल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली आणि पालिकेच्या बांधकाम विभागातील अभियंत्यांचे पितळ उघडे पडले.
- पंढरीनाथ कुंभार, भिवंडी
/>
शहरातील राजीव गांधी स्मृती उड्डाणपुलाच्या स्लॅबचा काही भाग कोसळून भगदाड पडल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली आणि पालिकेच्या बांधकाम विभागातील अभियंत्यांचे पितळ उघडे पडले. गेल्या काही वर्षापासून या पुलाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. ही घटना चिंताजनक असून, वाहतूककोंडी रोखण्याकरिता उड्डाणपूल बांधल्याने प्रश्न सुटतात किंवा कसे, याबाबत आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी आहे.
महापालिका प्रत्येक वीस वर्षांनी विकास आराखडा जाहीर करते. परंतु गेल्या पन्नास वर्षांत शहराच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी पालिकेच्या नगररचना व नगरविकास विभागाने केलेली नाही. या विभागामार्फत नवीन इमारतींना परवानगी देणे आणि अनधिकृत इमारतीकडे लक्ष देण्याचे काम केले जात आहे. मुंबई-आग्रा रोड शहरातून जात असल्याने या मार्गावरून मुंबई-नाशिक व अहमदाबादकडील अवजड वाहनांची वाहतूक सन १९९३पर्यंत शहरातून जाणाऱ्या महामार्गावरून होत होती. ही वाहतूक नाशिक-मुंबई बायपासवरून वळविल्याने या मार्गावरील ताण कमी झाला. तरी देखील अंजूरफाटा ते नदीनाका-चाविंद्रा भागात मोठ्या संख्येने अपघात होऊन जीवितहानी होत होती, तसेच धामणकर नाका येथे शालेय, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अपघाताची संख्या वाढल्याने या धामणकर नाका येथे शहरातील पहिला उड्डाणपूल १९९६साली युती शासनाच्या काळात बांधण्यात आला. या पुलाकडे पालिकेच्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पुलाच्या बांधकामाची झीज होत आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास या उड्डाणपुलाची अवस्था राजीव गांधी उड्डाणपुलासारखी होऊन त्यावर भगदाड पडायला वेळ लागणार नाही.
मुंबई-अहमदाबाद वाहतूक शहरातून होत असल्याने शहरातील कल्याणरोड व वंजारपाटी नाका येथील चौकात पादचाºयांच्या व वाहनांच्या अपघातात वाढ होऊन जीवितहानी वाढली होती, तसेच या मार्गावर सरकारी कार्यालये असल्याने नागरिकांना वाहातूककोंडीचा सामना करावा लागत असल्याने सन २००६ साली बागेफिरदोस ते रामेश्वरमंदिरापर्यंत राजीव गांधी उड्डाणपूल बांधण्यात आला. त्यापुढे बागे फिरदोस ते नदीनाका हा उड्डाणपूल एमएमआरडीएच्या माध्यमातून दोन वर्षापूर्वी भाजपा सरकारच्या काळात बांधला. कल्याणरोड येथील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी राजीवगांधी चौक ते साईबाबामंदिरापर्यंत चौथ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे.
वास्तविक हे चारही पूल बांधताना महापालिकेच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करून रस्तारूंदीकरण झाले नाही. परिणामी शहरातील वाहतूककोंडी कायम आहे. कल्याणरोड येथे चौथ्या उड्डाणपुलाचे काम चालू आहे. पालिका प्रशासनाने येथे रस्ता रूंदीकरण केले नाही. तसेच कल्याणकडे जाणारा पर्यायी मार्ग पालिकेने तयार केलेला नाही. या मार्गावरून मेट्रो रेल्वे जाणार असतानाही एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी अशोकनगर ते साईबाबा या पुलाची योजना केली. या पुलाचे बांधकाम सुरू असताना एमएसईबी वसाहतीजवळ पुलाच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याची घटना काही महिन्यापूर्वी घडली. त्यामुळे या नवीन पुलाबाबत नागरिकांनी भीती व्यक्त केली. हा पूल अशोकनगरपासून साईबाबा मंदिरापर्यंत प्रस्तावित होता. तो राजकीय पुढाºयांच्या हस्तक्षेपाने राजीव गांधी उड्डाणपुलास जोडण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे या कामाची गती मंदावली. या मार्गावर ना मेट्रो रेल, ना उड्डाणपूल अशी अवस्था एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी केली आहे. महापालिकेचे अधिकारी रस्ता रूंदीकरण न करता हातावर हात देऊन बसले आहेत. या मार्गावरून जाणाºया नागरिकांना व वाहनचालकांना मनपा प्रशासनाने वेठीस धरले आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीदेखील पावसाळ्याअगोदर राजीव गांधी उड्डाण पुलावरील पाणी वाहून नेणारे पाइप साफ केले नाहीत. त्यामुळे पुलावर पाणी साचून मोठमोठे खड्डे पडले. हे खड्डे बुजविण्यासाठी अथवा या पुलावरील वाहतूक बंद करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला नाही. त्यामुळे शेवटी खड्ड्यातील पाणी पुलावरील सिमेंटच्या स्लॅबमध्ये घुसून स्लॅबला भगदाड पडले आणि त्यामधील सिमेंटचे खपले पुलाखालील रस्त्यावर पडले. सुदैवाने ही घटना घडली तेंव्हा पुलाखाली कोणीही नव्हते. त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. या घटनेनंतर पालिका प्रशासनास जाग आली आणि पुलाच्या दुरूस्तीसाठी सुरूवात झाली.
या पुलासाठी निधी केंद्र शासनाकडून उपलब्ध झाला होता. त्यामधील भ्रष्टाचार त्यावेळी गाजला होता. त्याचा प्रत्यय आज भिवंडीकरांना आला आहे. पन्नास वर्षासाठी बांधलेल्या उड्डाणपुलास बारा वर्षातच भगदाड पडते, याची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे.