अपयशाला जिंकू या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:53 PM2018-03-27T23:53:17+5:302018-03-27T23:53:17+5:30

प्रत्येक माणसाला आयुष्यात कधी ना कधी अपयशाचा सामना करावाच लागतो. प्रत्येक जण आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यात अडखळतो, पडतो, आपटतो, तो किती लवकर त्यातून सावरतो ते महत्त्वाचं असतं

Win the failure! | अपयशाला जिंकू या!

अपयशाला जिंकू या!

- संतोष सोनवणे
प्रत्येक माणसाला आयुष्यात कधी ना कधी अपयशाचा सामना करावाच लागतो. प्रत्येक जण आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यात अडखळतो, पडतो, आपटतो, तो किती लवकर त्यातून सावरतो ते महत्त्वाचं असतं. अपयशाचा सामना करताना झाल्या गोष्टीतून शक्य तितक्या लवकर बाहेर पडणे आणि नव्याने सुरुवात करणे आवश्यक असते. अपयशसुद्धा अनेक गोष्टी शिकवते. तुमच्याकडे धीर धरायची तयारी असेल तर अपयशातून बाहेर पडून, नवीन गोष्टी शिकून तुम्ही अपयशावर मात करू शकता. मात्र दुर्दैवाने अपयश ही अशी गोष्ट आहे की जी शाळा किंवा पालक हे घटक जाणीवपूर्वक शिकवीत नाहीत किंवा त्याकरिता मनाची हवी तशी तयारी करूनही घेतली जात नाही.

‘मुलांना जे यायलाच हवे, असे शिक्षक-पालकांना वाटते त्यापेक्षा जे मुलांना हवे, ते शिकता येण्याची जागा म्हणजे शाळा, असे व्हायला हवे,’ असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ जॉन होल्ट यांनी त्यांच्या एका पुस्तकात केले आहे. या पुस्तकाची आठवण मला काल एका बातमी पाहिल्यावर आली. परीक्षेचा पेपर कठीण गेला म्हणून एका दहावीच्या मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज शाळा, अभ्यास आणि परीक्षांच्या व्याख्या खूपच बदल्यात. तणाव आणि अपेक्षांचे ओझे त्यामागे दिसून येते.
एक सुविचार आपल्याला अनेक ठिकाणी वाचण्यास मिळतो तो म्हणजे, ‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ अपयश हा यशाइतकाच जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मुलांना सतत आणि लवकर यश मिळाले की, त्यांना स्वत:विषयी आणि आपल्या घेतलेल्या कष्टाप्रति एक आदर निर्माण होतो. मात्र अपयश ही अशी गोष्ट आहे की, आलेल्या अपयशाला तोंड देण्याची किंवा दोन हात करण्याची मनोभावना मुलांमध्ये निर्माण झाली आहे का?
आपल्या कष्टावर आणि पात्रतेवर विश्वास असणारी चांगली-चांगली व्यक्तीही आपल्या क्षेत्रात कधीकधी अपयशी होतात. चांगला खेळाडूही शून्यावर बाद होतो तर उत्तम तयारी आणि नियोजन करूनही काही कार्यक्र म अयशस्वी होतात. तर कधी लेखी परीक्षेत चांगले गुण मिळविणारे उमेदवारही मुलाखतीत अपात्र ठरतात. एखादं मूल जेव्हा परीक्षेत नापास होतं किंवा ते त्याच्या विद्यार्थीदशेतील एखाद्या गोष्टीत अपयशी ठरते, तेव्हा त्याकडे पालक आणि एकूणच समाज एका वेगळ्या नजरेतून पाहू लागतो. अशा मुलावर मग निर्बुद्ध, मंद, अक्कल नसलेला अशी शेरेबाजी करून सगळे मोकळे होतात. हा अपयशाचा शिक्का त्या मुलाच्या मनावर शाळा आणि पालक यांच्या माध्यमातून वारंवार बिंबविण्याचा प्रयत्न केला जातो. या गोष्टीचे मुलाच्या मनावर विपारित परिणाम होऊन त्याला ते खूप अपमानस्पद वाटते. पालकदेखील आपल्या मुलाला इतरांसमोर बोलण्यात मोठी धन्यता मानतात. त्यामुळे पालक, घर, शाळा आणि सहकारी यांचा मानसिक दबाव हा त्या मुलावर वाढत जातो. अशी मुले पुढे मग या अपयशातून बाहेर पडण्याऐवजी नैराश्यात गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. मुलांना अपयश का येते? वर्गात प्रत्यक्षात काय घडते? अपयशी होणारी मुले काय करत असतात? त्यांच्या डोक्यात काय चालले असते? त्यांच्यातील क्षमतांचा ते अधिक वापर का करत नाहीत? यावर विचार व्हायला हवा.
अशावेळी पालकांनी मुलांसोबतचा आपला संवाद अधिक खुल्या मनाने आणि पुढील प्रयत्नांकरिता अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे बळ आपल्या बोलण्यातून द्यायला हवे. अपयशातून बाहेर पडणं म्हणजे नव्याने प्रयत्नांना सुरुवात करणं. सगळ्यात आधी अपयश मिळाल्याच्या भावनेतून मुलाला बाहेर येणं महत्त्वाचं ठरतं. आपल्या चुका स्वीकारून पुन्हा वाटचाल करणं महत्त्वाचं ठरतं. अशी सुसंवादाची भाषा मुलाला आधार देते.
आपल्या मुलाने भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अपयशाला कशाप्रकारची प्रतिक्रि या द्यावी या करिता मानसिकदृष्ट्या त्याला अधिक सक्षम करण्याची जबाबदारी ही पालकाची असायला हवी. पालकाच्या अशा प्रयत्नातून मूल यश आणि अपयश याचा सहसंबध जाणायला शिकेल. यशाची कारणे आणि अपयाशामागील कारणे यांचे विश्लेषण तो आपल्या मानसिक पातळीवर करू शकेल. त्यानुसार पुढची वाटचाल निश्चित करू शकेल. अपयशात घोटाळण्यापेक्षा नवीन दृष्टिकोनातून विचार करण्याची समर्थ मानसिकता निर्माण करणे, हे सुजाण पालकत्वाचे एक वैशिष्ट्य आहे.
शाळेतील अभ्यास नीरस आणि कंटाळवाणा असल्याने बुद्धी, कौशल्य आणि क्षमतांचा कमीतकमी वापर करावा लागतो, म्हणून ती कंटाळतात.
शाळेतील शिक्षकांनी जर त्यांच्या परंपरागत जबाबदारीचा वरिष्ठ, पोलीस आणि न्यायाधीश या भूमिकांचा त्याग केला तरच ते विद्यार्थ्यांना समजून घेऊ शकतील आणि मुलांना ते मदत करू शकतील. मुलं एकमेकांना मदत करताकरता एकमेकांकडून शिकू-शिकवू पाहतात. त्यासाठी शिक्षकांनी मुलांना अवकाश आणि वेळ द्यायला हवा. बहुतेक शाळांची भावना असते की, शिस्त केवळ भीती, धमकी, शिक्षा यांच्याद्वारे करता येते. मात्र, सहकाराने शिस्त राखली जाते, असा सिद्धान्त आहे.
मुलांना जे काय हवे ते शिकण्याची योग्य व सर्वोत्तम जागा म्हणजे हे जग व मोठ्या माणसांचे आयुष्य. स्वत:च्या पद्धतीने जग थोडेसे चांगले व उजळ बनविण्यासाठी सर्व मुलांना मदत करणे ही शिक्षकांनी आपली जबाबदारी मानून ती आनंदाने पार पाडायला हवी. अध्यापनावर आणि मुलांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिक्षक आणि पालकाने याचा बारकाईने विचार करायला हवा.
 

Web Title: Win the failure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.