धुक्याची दुलई, हिरवा गालिचा अन् सुहाना मंजर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 07:39 PM2017-10-08T19:39:52+5:302017-10-09T15:11:43+5:30
खिडकीतून बाहेर डोकावून बघितलं. अजून उजाडलं नव्हतं. अंधारच अंधार. घड्याळात तर पहाटेचे सहा वाजले. मग काय, उजाडेलच आता!
- संजय मेश्राम
खिडकीतून बाहेर डोकावून बघितलं. अजून उजाडलं नव्हतं. अंधारच अंधार. घड्याळात तर पहाटेचे सहा वाजले. मग काय, उजाडेलच आता! कॅमेरा घेतला नि निघालो. धुंद धुंद हवा अन् मंद मंद गारवा. घरापासून साधारण सात किमी अंतरावर खडकवासला धरण आहे. धुकं असल्यानं वाटत होतं, जणू अरबी समुद्र बघत आहे. नेहमी दिसणारी समोरची हिरवीगार टेकडी अदृश्य झाली होती. पाण्याचा अन् आकाशाचा रंग एकच झाला होता. दोघांमधील सीमारेषा कळतच नव्हती.
आयुष्याची संध्याकाळ जगणारे काही आजोबा भल्या पहाटेचं हे दृश्य विस्मयतेनं बघत होते. जुन्या आठवणींत हरवून गेले होते. मीही धुक्यात एकजीव होऊन हे त्यांचे पाठमोरे दृश्य कॅमेरात अलगद टिपून घेत होतो. पुढं सिंहगडला जाणारा रस्ता निर्मनुष्य होता. एखाद-दुसरी रिक्षा किंवा वाटसरू दिसायचा. धुक्यातून कुणी तरी चालत येत होतं. फोटो क्लिक केला. छान आला. आकाशात अगदी जवळून ढगांचे धुके (की धुक्याचे ढग) बागडत होते. खरं तर मीही या ढगांतूनच जात होतो. रस्त्याच्या दुतर्फा विशिष्ट पिवळी फुलं डोलत होती. या मोसमात इथं लाखोंच्या संख्येनं अशी फुलं उमलली असतात. यश चोप्रा यांच्या चित्रपटातील स्वित्झर्लंड मला इथंच गवसतो. म्हणून इथं मी नेहमीच येतो.
सिंहगडचा रस्ता सोडून मी पानशेतच्या मार्गाला लागलो. सूर्योदय झाला होता. कोवळी किरणं धुक्यातून आरपार जात होती. धुक्याचं राज्य अजूनही कायम होतंच. त्या तिथं दूर आणखी सुंदर दृश्य होतं. डोंगरद-यांमधून धुक्याचे ढग मनसोक्त फिरत होते. गर्द हिरव्या डोंगराच्या मधोमध ढगांचा लांबच लांब शुभ्र पट्टा आल्हाददायक वाटत होता. कुठंही बघितलं तर ढगांचे पुंजके तयारच. सगळी दृश्ये टिपून घेण्यात मी मग्न होतो. तिकडं एक जलाशय आणि अस्पष्ट दिसणारी वस्ती. फ्रेममध्ये एक झाड घेऊन या दृश्यावर मी कॅमेरा केंद्रित केला.
क्लिक करणार एवढ्यात कसलीशी हालचाल दिसली. कॅमे-यावरून नजर दूर केली अन् समोर बघितलं. अहाहा! काय सुंदर आणि रुबाबदार मुद्रा! एक मोर अगदी पंधरा-वीस फुटांवर येऊन ऐटीत बसला होता. काय ते रंग! जणू हे त्याचंच राज्य. माणसानं त्यांच्या या दुनियेत चुकूनही येऊ नये. क्षणही न दवडता क्लिक केलं. अतिशय सुंदर फोटो संग्रही जमा झाला. आजच्या भेटीची ही मिळकत. पुन्हा समोर बघितलं तर मोर गायब! एक एक पाऊल टाकत सावकाश जवळ जाऊन बघितलं. काही फायदा नाही. गायब म्हणजे गायब. कुठं कसली हालचालही जाणवत नव्हती. परिसरात असलेल्या वनराईतून इतर मोरांचा आवाज मात्र येत होता.
थोडं माघारी फिरून राजगड आणि तोरणा किल्ल्याच्या दिशेनं जाणा-या रस्त्याला लागलो. सर्वत्र हिरवी हिरवी झाडं... किर्रर्र जंगल. रस्त्यावर पाना-पानांमधून पडलेले प्रकाशाचे तुकडे. क्षणभर वाटायचं, आपण कोहमारा जंगलात आलो की काय! वाटा, नागमोडी वळणं, फुलांचे ताटवे आणि गवताचे लुसलुशीत गालिचे दिसले की जाणवायचं, नाही गड्या ! हे कोहमाराचे जंगल नाही.
सिंहगड किल्ल्याच्या सभोवताल बारा छोटी- छोटी गावं वसली आहेत. म्हणजे किल्ल्याला बारा गावांचा घेरा आहे. त्यातीलच हे एक गाव- थोपटेवाडी. रस्त्याच्या एका बाजूला टेकडीवर गाव तर दुस-या बाजूला खोल दरी. त्यात फुलांचे ताटवे. त्यातून जाणा-या पायवाटा... फोटो काढत असतानाच एक आजोबा जवळ आले. त्यांना विचारलं, ‘‘काय आजोबा ओळखलं का?’’
हात जोडल्यासारखे करीत ते म्हणाले, ‘‘हो. ओळखलं.’’
त्यांच्या चेह-यावरील भाव वेगळेच होते. आणखी विचारलं, तर त्यांना सांगता आलं नाही. खरं तर त्यांनी मला ओळखलंच नव्हतं.
महिनाभरापूर्वी मी या भागाला फिरायला आलो होतो. मी फोटो काढत होतो, तेव्हा हे आजोबा आपल्या चहाच्या झोपडीवजा दुकानात चहा पीत होते. मी त्यांना गमतीनं लांबूनच म्हटलं होतं, ‘‘अहो काय एकट्यानंच चहा पिता? त्यांना संकोच वाटला. मलाही त्यांनी आग्रह केला होता. मी ‘माफ करा’ म्हणत निघून गेलो होतो. ही आठवण त्यांना सांगितली. त्यांनी पुन्हा आग्रह केला. या वेळी मी होकार दिला. ते स्टोव्हवर चहा तयार करू लागले. मी बसल्या जागेवरूनही दिसेल ते फोटो टिपत होतो.
अरे! यांच्या डोक्यावरची टोपी कुठं गेली? आता तर हे टोपी घालूनच होते. मला कळलेच नाही. ते आजोबा कपात चहा ओतत होते. चहा ओतून झाल्यावर हातातील टोपी त्यांनी पुन्हा डोक्यात घातली.
अच्छा! तो ये बात है! व्वा!
त्यांनी चहाचं तापलेलं पातेलं पकडण्यासाठी पटकन डोक्यावरील टोपी काढली होती.
मला गंमतच वाटली. मनातच हसू लागलो. त्यांना तसं जाणवू दिलं नाही.
ते गप्पा मारू लागले। ‘कुणीही कुणाचं नसतं’ हे त्यांच्या गप्पांचं सार होतं. आपल्या जिंदगानीचे अनुभव सांगत होते. मी हो ला हो लावत होतो. ते म्हणाले, तसं नसतं तर मला हे काम का करावं लागलं असतं? मुलं नीट वागत नाही. बोलत नाही. अहो, तंबाखूसुद्धा देत नाहीत. काय अपेक्षा करणार त्यांच्याकडून! सारं जग पैश्याच्या मागं धावतंय राव! काय करायचं आहे पैसा गोळा करून!
हे चहावाले आजोबा व्यक्त होत होते. मी त्यांना एक श्रोता मिळालो होतो. त्यांची छोटी नात आली दुडूदुडू. तिला मी खिशातील चॉकलेट दिलं. आजोबांना बळजबरीनं चहाचे पैसे दिले आणि म्हटलं, भेटू पुन्हा!
उंचावरून खाली काही घरे दिसत होती. एका कौलारू घरासमोर बैलगाडी होती. छान वाटलं. काही कोंबड्या दाणे टिपत होत्या. एक गाय बांधलेली होती. काही बगळेही बागडत होते. फोटो क्लिक केला. वेल्हे, पाबे गावे लागली. मध्येच जंगल, मध्येच गाव, माळरान, शेती. डोक्याला फडकं गुंडाळून शेतात काम करणा-या स्त्रिया, मेंढ्यांचा कळप, समोर चालणारा कुत्रा.
एका शेतात एक शेतकरी हातानेच कसली तरी औषधाची भुकटी वेलींवर टाकताना दिसला. विचारलं, तर म्हणाला, हे औषध नव्हे; राख आहे. पावट्यावर कीड झाली आहे ना. राखेमुळे ती कमी होईल. कुणीतरी सल्ला दिला होता. करून बघायला काय हरकत आहे! इथं मोकळी जागा होती. मी मशागत केली. पैसा खर्च केला. या भागाला लोक फिरायला येतात, खातात-पितात. बाटल्या कुठंही फेकून देतात. आमच्या पायाला काचा टोचतात. निसर्गानं एवढी देणगी दिली आहे, त्याचा आनंद घ्यावा. असं वागू नये. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा ढीग जमा होतो. कुणाला काय बोलणार? आपल्या शेतात राबायचं, बस्स! तीन वेळा जेवण करतो, तीन वेळा देवाचं नाव घेतो. कसला शौक नाही, कसलं व्यसन नाही. कुणाशी भांडण नाही, तंटा नाही. त्यांचा निरोप घेऊन निघालो, तर म्हणाले, ‘नीट जा.’
वाटलं, ही मेहनतीवर विश्वास ठेवणारी माणसं साधी नाहीत. ही मार्गदर्शक पुस्तकं आहेत. यांच्या बोलण्यात राजकीय थापा नाहीत. मायेची थाप आहे. मागे फिरून सहज बघितलं, तर ते आपल्या कामात मश्गुल झाले होते.
पाबे घाटाची अवघड वळणं चढताना दुचाकीलाही धाप लागते. वर चढल्यावर अगदी नजराणा असतो. दूरवर डोंगरांच्या विविधरंगी छटा विलोभनीय दिसतात. खाली एक तलावावर गाई पाणी पिताना दिसल्या. अगदी छोट्या छोट्या. हिरव्या शेतांचे छोटे छोटे चौकोन जणू टाईल्स. पक्ष्यांची किलबिल आणि मोकळं आकाश. शुद्ध हवा. किती साठवून घ्यावी, आतल्या आत.
उंचावर साधारण अर्धा तास एकाच जागी थांबून परतीला लागलो. शेतात जाणाºया स्त्रिया दिसल्या. शाळेकरी मुलामुलींचे थवे दिसले. मध्येच एखादी एसटी दिसली. आॅटोरिक्षातून उतरून काठी टेकत ओळीने चालणाºया तीन आजीबाई दिसल्या. अर्थात कॅमेºयात हे दृश्य टिपून घेतलं.
डावीकडे उंच डोंगरावरून मोळी घेऊन येताना दोघी दिसल्या. मी झाडाखाली थांबलो. त्या माझ्या दिशेनं पायवाटेनं येत होत्या. मी लांबूनच फोटो टिपत होतो. त्या जवळ आल्या. मी जवळून काही फोटो काढले. त्यांनी विश्रांतीसाठी मोळ्या खाली ठेवल्या. पदरानेच चेहरा पुसत रस्त्याच्या कडेला बसल्या.
मी त्यांच्याशी संवाद साधला. ‘‘एवढ्या उंचावर जाता, भीती नाही वाटत?’’
त्या म्हणाल्या, ‘‘इथं जवळच आमचं गाव आहे. रस्ता सुरूच असतो. लोक जात येत असतातच. नाही वाटत भीती.’’
‘‘आणि मोळ्या विकता का?’’
‘‘कुठं विकणार आणि कोण घेणार! गॅसचे दर वाढले ना! तेवढीच आपली बचत.’’
माझ्या हातात पाण्याची बाटली होती. त्यांना पाणी हवं का म्हणून विचारलं, तर म्हणाल्या, आहे आमच्याजवळ!
त्यांना मी माझ्याकडील बिस्किटांचा पुडा दिला. त्यांनी घेतला. मला खूप बरं वाटलं. एक म्हणाली, आता जाताना मोळी उचलू लागा. मला मोठी गंमत वाटली.
तेवढ्यात गावातील एक स्त्री आली. त्यामुळं माझी मदतीची संधी गेली. त्याची मनात रुखरुख वाटली. मोळ्या घेऊन चालत असतानाचा एक पाठमोरा फोटो क्लिक केला.
* * *
घराच्या दिशेनं परतताना आणखी काही फोटो क्लिक करण्याचा मोह आवरला. दुपारचे बारा वाजले होते. खरं तर दिवसभर याच वातावरणात थांबावंसं वाटत होतं. एक वेगळाच आनंद घेऊन तृप्त होऊन मी परतत होतो. मन अगदी हलकं हलकं होऊन उडत होतं. फुलपाखरासारखं...