बँक खात्यात चुकून जमा झाले 1 लाख 11 हजार रुपये; 'त्याने' लगेच फाडला चेक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 01:20 PM2019-08-31T13:20:26+5:302019-08-31T19:01:07+5:30
नितीन जैस्वाल यांचे चिखली अर्बन बँकेच्या खात्यात अचानकपणे १ लाख ११ हजार रुपये आल्याचा संदेश मिळाला.
धाड : चुकीने दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर झालेली रक्कम मिळेल की नाही याची शाश्वती नसताना येथील व्यापाºयाने आपला प्रामाणिकपणा सिद्ध करत संबंधित व्यक्तीस आपल्या खात्यात आलेल्या तेवढ्या रक्कमेचा धनादेश देऊन माणुसकीचा प्रत्यय दिला. ही रक्कम थोडी नसून तब्बल १ लाख ११ हजार रुपये असल्याने या घटनेचे परिसरात कौतुक होत आहे.
येथील व्यापारी नितीन जैस्वाल यांचे चिखली अर्बन बँकेच्या खात्यात अचानकपणे १ लाख ११ हजार रुपये आल्याचा संदेश मिळाला. त्यांनी तत्काळ शाखा अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. मात्र उपरोक्त रक्कम ही एन.ए.एफ.टी. माध्यमातून झाल्याने ती कोणी पाठविली याबाबत सविस्तर माहिती मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता एवढी मोठी रक्कम आली, परंतु ती पाठवली कोणी हा प्रश्न पडला. २२ ऑगस्ट रोही ही रक्कम खात्यात आली होती ती जालना जिल्ह्यातील भोकरदन शाखेतून. यावर स्थानिक शाखाधिकारी यांनी तेथील शाखेशी संपर्क साधून उपरोक्त ग्राहकांचा शोध घेतला व त्यांना याबाबत माहिती देण्यात आली. तेव्हा सदर रक्कम नामदेव सोनुने (रा. मुर्तड, ता. भोकरदन) यांनी पाठविली होती. चुकून ती नितीन जैस्वाल यांच्या खात्यात जमा झाली. याठिकाणी नामदेव सोनुने यांना नितीन जैस्वाल यांनी १ लाख ११ हजारांचा धनादेश देऊन आपल्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय दिला. यावेळी वैभव मोहिते, बबन जाधव, प्रवीण वाघ, मोहन पवार, संदीप तायडे यांची उपस्थिती होती.