एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त, बोराखेडी पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 10:51 PM2019-02-12T22:51:33+5:302019-02-12T22:51:43+5:30
बनावट नोटांनी भरलेल्या एक कोटी दहा लाख आठ हजार चारशे रुपयांच्या बॅगसह एकास बोराखेडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मोताळा : बनावट नोटांनी भरलेल्या एक कोटी दहा लाख आठ हजार चारशे रुपयांच्या बॅगसह एकास बोराखेडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोताळा
तालुक्यातील मोहेगाव फाट्यानजीक मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, मोहेगाव शिवारात आरोपीसमवेत असलेले त्याचे काही साथीदार मात्र फरार झाल्याची माहिती आहे. बोराखेडी पोलिस ठाण्यातंर्गत बुलडाणा-मलकापूर मार्गावरील मोहेगाव फाट्यानजीक एक व्यक्ती संशयास्पदस्थितीत बॅग घेऊन उभा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे ठाणेदार माधवराव गरुड यांच्या
मार्गदर्शनात नायक पोलिस कॉन्स्टेबल सय्यद तय्यबअली, सुनील भवटे, गजानन वाघ, नरेश रेड्डी, दामोदर लठाड, चालक समीर शेख यांनी घटनास्थळ गाठून किसन गजानन तायडे (२२, रा. तारतलाव कॉम्प्लेक्स, बुलडाणा) या संशयिताला बॅगसह ताब्यात घेतले.
पंचांसमक्ष या बॅगची झडती घेतली असता त्यात दोन हजार, पाचशे व दोनशे रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या. पाचशे रुपयांच्या बंडलांमध्ये वरील बाजूक एक खरी नोट व खाली मुलांच्या खेळण्यातील नोटा होत्या तर दोन हजार रुपयांच्या चार हजार ५४४ नोटा, पाचशे रुपयांच्या तीन हजार ८०८ नोटा व दोनशे रुपयांच्या ८२ मुलांच्या खेळण्यातील नोटा यात आढळून आल्या आहेत. एक कोटी दहा लाख आठ हजार रुपयांच्या या बनावट नोटा असून पोलिसांनी इन कॅमेरा या नोटांची मोजणी केली. रात्री उशिरा पर्यंत ही मोजणी सुरू होती. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मोहेगाव येथील आश्रमशाळेमागील शेतातून पोलिसांनी बुलडाणा येथील उपरोक्त संशयितास ताब्यात घेतले आहे.
प्रकरणाचे गूढ कायम
ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर या बनावट नोटा घेऊन संशयीत व त्याचे साथीदार तेथे काय करत होते. हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे या प्रश्नाची जोवर उकल
होत नाही तोवर या प्रकरणाचे गुढ कायम राहणार आहे. पोलिसांच्या चौकशीत या प्रकरणात आणखी काय निष्पन्न होते यावर अनेक बाबी अवलंबून आहेत. मात्र सध्या या प्रकरणाचे गूढ कायम आहे.
रॅकेट सक्रिय?
बुलडाणा जिल्ह्यात यापूर्वीही बनावट नोटा पकडण्यात आला आहे. यातील काही प्रकरणांचा अद्याप तपास पूर्ण झालेला नाही. चार वर्षा अगोदर बुलडाणा-मलकापूर मार्गावरच दाताळा गावानजीक बनावट नोटा प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले होते. याच भागातील बनावट नोटा प्रकरणातील आरोपी हा
काही काळ पुण्याच्या कारागृहात होता. शेगाव रेल्वे स्थानकावरही दोन ते तीन वर्षापूर्वी बनावट नोटा हस्तांतरण करताना पोलिसांनी कारवाई केली
होती. या प्रकरणात हिंगोली जिल्ह्यातील एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला होता. त्यानंतर मात्र या प्रकरणांचा तपासात पुढे काय झाले ही माहिती समोर आलेली नाही. त्यातच मंगळवारी हा प्रकार उघडकीस आला आहे.