वीजहानी १0 टक्क्यांनी नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:29 AM2017-11-14T01:29:25+5:302017-11-14T01:29:56+5:30
अखंडित वीज पुरवठय़ासाठी वीज वितरण अंतर्गत पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना जिल्ह्यात यश आले असून, सात पालिका क्षेत्रात दहा टक्क्यांनी तांत्रिक आणि व्यावसायिक हानी रोखण्यात यंत्रणेला यश आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : अखंडित वीज पुरवठय़ासाठी वीज वितरण अंतर्गत पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना जिल्ह्यात यश आले असून, सात पालिका क्षेत्रात दहा टक्क्यांनी तांत्रिक आणि व्यावसायिक हानी रोखण्यात यंत्रणेला यश आले आहे. रिस्ट्रकचर्ड अँक्सलरेटर पावर डेव्हलपमेंट अँन्ड रिफॉर्मस प्रोग्राम अंतर्गत (आरएपीडीआरपी) जिल्ह्यातील सात पालिका क्षेत्रासह राज्यातील १२७ शहरामध्ये गेल्या दोन वर्षात ही मोहीम राबवली गेली आहे. त्याचे दृष्यपरिणाम आता समोर येत आहेत. तांत्रिक आणि व्यावसायिक हानी ही १५ टक्क्यांवर आणण्याचे यामध्ये उद्दिष्ट होते.
सातही पालिका क्षेत्रात या पायाभूत सुविधा पूर्ण होण्याअगोदर व्यावसायिक आणि तांत्रिक हानी (वीज गळती) ही २९.११ टक्के होती. ती आता सरासरी सातही पालिका क्षेत्रांमध्ये १८.३0 टक्के झाली आहे. गेल्या काही काळापासून वीज वितरणमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक हानीमुळे यंत्रणा त्रस्त झाली होती. त्यातच जुनाट साहित्य आणि वीज वहन करणार्या तारांचे आयुष्यही संपुष्टात येत असल्यामुळे वीज वितरणसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीने राज्यातील १२७ शहरांमध्ये दोन वर्षांपासून ही मोहीम सुरू केली होती. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, चिखली, खामगाव, मलकापूर, नांदुरा, शेगाव आणि बुलडाणा शहराचा समावेश करण्यात आला होता. प्रामुख्याने २५ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये ही पुनर्रचित गतिमान विद्युत विकास योजना कार्यान्वित केली गेली होती. यासाठी उपरोक्त सातही पालिका क्षेत्रासाठी ४६ कोटी एक लाख रुपये खर्च करण्यात आला. अखंडित वीज पुरवठा करण्याच्या दृष्टीने ही मोहीम व्यापक स्तरावर राबविण्यात आली होती. परिणामी, मेहकरमधील ४४ टक्कय़ांवर असलेला तांत्रिक आणि व्यावसायिक हानी १६-१७ या वर्षामध्ये २६ टक्क्यांवर आली आहे. चिखलीमधील ३१.८८ टक्के असलेली ही हानी आता १३.२४ टक्क्यांवर आली आहे.
वाहिन्यावरील तारा बदलल्या!
मोहिमेंतर्गत ३३ के.व्ही आणि ११ के.व्ही उच्चदाब वाहिनी आणि लघुदाब वाहिनीवरील १0९ किमीच्या वीज तारा बदलण्यात आल्या. सोबतच १६२ नवीन वीज रोहित्र सातही शहरामध्ये लावण्यात येऊन जुन्या असलेल्या वीज रोहित्रांची क्षमता ६३ ते १00 केव्हीए पर्यंत वाढविण्यात आली.
व्यावसायिक हानीवर नियंत्रण शक्य!
तांत्रिक हानीवर नियंत्रण ठेवणे शक्य नसले तरी व्यावसायिक हानीवर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. वानगी दाखल बुलडाण्यात सुमारे २३ हजार वीज ग्राहक असून, महिन्याकाठी पावणे दोन कोटी रुपयांची देयके त्यांना दिल्या जातात. ड्यु डेटच्या र्मयादेत जर एक कोटी रुपयांचा भरणा ग्राहकांनी केला तर उर्वरित ७५ कोटी रुपये ही व्यावसायिक हानी असते. हीच हानी कमी करण्यासाठी वीज वितरणने ऑनलाइन वीज भरणा सुविधा उपलब्ध केली आहे. सप्टेंबर महिन्यात ८२ हजार ग्राहकांनी सुमारे आठ कोटी रुपयांचा वीज देयकांचा भरणा ऑनलाइन केला आहे. परिणामी, व्यावसायिक हानी नियंत्रणात येण्यास मदत होत आहे.