अपंग विद्यालयात उपलब्ध होणार ऑक्सिजनयुक्त १०० बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:33 AM2021-04-13T04:33:18+5:302021-04-13T04:33:18+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सक्रिय रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटर, कोविड केअर हॉस्पिटलमध्ये खाटांची संख्या कमी ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सक्रिय रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटर, कोविड केअर हॉस्पिटलमध्ये खाटांची संख्या कमी पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार रुपेश खंडारे यांनी दिली.
क्षय रोगावरील उपचारासाठी बुलडाण्याचे क्षय आरोग्य धाम हे राज्यात प्रसिद्ध आहे. आता या रुग्णालयाच्या इमारतीमध्ये कोरोना बाधितांसाठी ८० बेड्सची उपलब्धता करण्यात येणार आहे. यापैकी ४० बेड सध्या उपलब्ध करण्यात आले आहेत. याच परिसरातील अपंग विद्यालयात कोविड केअर सेंटर कार्यान्वित आहे, त्याजागी आता सुमारे आठवड्याभरात कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात येणार आहे, तिथे ऑक्सिजन सुविधायुक्त १०० बेड्सची सुविधा राहणार आहे. यासाठी आवश्यक तांत्रिक बदल व सुविधा उपलब्ध करण्यासाठी आगामी एक आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रामध्ये स्थलांतरित करण्यात येणाऱ्या कोविड केअर सेंटरमध्ये सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येतील, असे तहसीलदार रुपेश खंडारे यांनी सांगितले.