दुसरबीड येथे वीकेंड लॉकडाऊनला १०० टक्के प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:33 AM2021-04-11T04:33:57+5:302021-04-11T04:33:57+5:30
दुसरबीड : येथील नागरिकांनी १० एप्रिल रोजी वीकेंड लॉकडाऊनला १०० टक्के प्रतिसाद दिला. नागरिकांनी शासन, प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून ...
दुसरबीड : येथील नागरिकांनी १० एप्रिल रोजी वीकेंड लॉकडाऊनला १०० टक्के प्रतिसाद दिला. नागरिकांनी शासन, प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून घरी राहणेच पसंत केले. त्यामुळे गावातील बाजापेठेत कमालीची शांतता दिसून आली.
दुसरबीड हे परिसरातील गावांसाठी बाजारपेठ असल्यामुळे येथे ग्रामीण भागातील नागरिक आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याकरिता व घरगुती साहित्य खरेदीकरिता येतात. परंतु शनिवारी गावातील व ग्रामीण भागातील सर्व लोकांनी आपल्या घरी राहणे पसंत केले. शासनाच्या नियमाचे पालन करत कोरोनाची साखळी खंडित करण्याकरिता प्रशासनास सहकार्य केले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली असून अनेकांना आपले प्राणसुद्धा गमवावे लागले आहेत. वास्तविक कोविडची साथ आटोक्यात आणण्याकरिता व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्याकरिता अनिष्ट चालीरीती रूढी व परंपरांना फाटा देणे आजरोजी गरजेचे असून ग्रामीण भागामध्ये हिंदू संस्कृतीप्रमाणे हा लग्नसराईचा दिवस आहे. शासनाने ठरवून देऊनसुद्धा लग्नाच्या नियमाकडे दुर्लक्ष केले जात आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होऊन साथीचा प्रसार होण्यास मदत झाली आहे. मात्र या साथीवर नियंत्रण मिळविण्याकरिता शासनाने लागू केलेल्या वीकेंड लॉकडाऊनचे नागरिकांनी कठोर पालन केले. सर्व दुकाने बंद ठेवण्यात आल्याने येथील बाजारपेठेमध्ये शुकशुकाट दिसून आला. रस्त्यावरही गर्दी दिसून आली नाही.