बुलडाण्यात १०७ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:37 AM2021-04-28T04:37:32+5:302021-04-28T04:37:32+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण पूर्ववत मेहकर : तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण मोहीम लसीअभावी बंद झाली होती. परंतू ...
प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण पूर्ववत
मेहकर : तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण मोहीम लसीअभावी बंद झाली होती. परंतू आता लसीचा पुरवठा झाल्याने आरोग्य केंद्रातील लसीकरण मोहीम पुन्हा पूर्ववत झाली असल्याचे दिसून येते.
अत्यावश्यक कामासाठी ई-पास
बुलडाणा : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या आनुषंगाने जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमी अत्यावश्यक कामासाठी आता ई-पास लागू करण्यात आलेली आहे. परंतू अनेक वाहनचालक ई-पास न काढताच प्रवास करत असल्याचे दिसून येते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साखरखेर्डा पोलिसांकडून पाहणी
साखरखेर्डा : दरेगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साखरखेर्डा पोलिसांकडून सोमवारी पाहणी करण्यात आली. प्रत्येकाने मास्क लावावे, हात धुवावे, विनाकारण बाहेर पडू नये, सार्वजनिक ठिकाणी बसून गर्दी करू नये, असे आवाहन यावेळी ग्रामस्थांना पोलिसांनी केले. साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण गावाची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायत सचिव व आशासेविका कर्मचारी, शिवसेना नेते बबन जायभाये, मनसे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राधेश्याम बंगाळे पाटील आदी उपस्थित होते.
कोरोनाबाधितांची संख्या वाढली
मेहकर : तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. २७ एप्रिल रोजी तालुक्यात १६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्येदेखील आता धास्ती भरली आहे. दोन दिवसांपूर्वीही तालुक्यात एकाच दिवशी १०० रुग्ण सापडले होते.
गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
लोणार : लाॅकडाऊनमध्ये मजूर व गाेरगरिबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.
अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणी गर्दी
बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू आहेत. या ठिकाणी नागरिकांकडून गर्दी होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पोलिसांकडून दुचाकीस्वारांची चौकशी
बीबी : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने मेहकर ते सिंदखेड राजा मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुचाकीस्वारांची कसून चौकशी केल्या जात आहे. विनाकरण फिरत असल्याचे आढळून आल्यास कारवाई होत आहे.
कोरोना संकटातही शेतीकाम सुरू
दुसरबीड : सध्या बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा संकटातही तालुक्यातील शेतकरी शेतात राबताना दिसून येत आहेत. शेतात मोकळे वातावरण असल्याने अनेकांनी शेतातच थांबणे पसंत केले आहे, तर काहींनी शेतातच मुक्काम ठोकला आहे.
कोरोना काळात लिंबूची मागणी
बुलडाणा : कोरोना काळात शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी क जीवनसत्व असलेल्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जात आहे. लिंबूमध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळत असल्याने सध्या लिंबूची मागणी चांगलीच वाढल्याचे दिसून येत आहे.
कोविड सेंटर वाढविण्यावर भर
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड सेंटर वाढविण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर दिसून येत आहे. बुलडाणा शहरासह मेहकर, सिंदखेड राजा तालुक्यांत आणखी नव्याने कोविड सेंटर उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत.