बुलडाणा जिल्ह्यात ‘१०८’ रुग्णवाहिकेची चाके मंदावली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 03:19 PM2020-01-03T15:19:22+5:302020-01-03T15:19:29+5:30
जिल्ह्यात २३ च्या जवळपास रुग्णवाहिका असल्या तरी आपत्कालीन स्थिती तथा अपघातप्रसंगी त्या वेळेत घटनास्थळी पोहचत नसल्याची ओरड आहे.
- योगेश देऊळकार
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आपत्कालीन स्थितीमध्ये त्वरीत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, या दृष्टीकोनातून जिल्ह्यात कार्यान्वीत करण्यात आलेल्या १०८ रुग्णवाहिका सेवेची गती मंदावल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. जिल्ह्यात २३ च्या जवळपास रुग्णवाहिका असल्या तरी आपत्कालीन स्थिती तथा अपघातप्रसंगी त्या वेळेत घटनास्थळी पोहचत नसल्याची ओरड आहे. विशेष म्हणजे यापैकी काही रुग्णवाहिका या बंद अवस्थेत असून काहींमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे. आधीच जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण ‘रेफर टु’ करण्याचे ग्रहण लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर किमानपक्षी ही सेवा गुणात्मक दर्जाने दिली जावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
रुग्णांवर तत्काळ उपचार व्हावे, या उद्देशाने २६ जानेवारी २०१४ पासून १०८ रुग्णवाहिकेची सेवा राज्यभर सुरू करण्यात आली आहे. सर्व जिल्हा स्तरावर हे काम बीव्हीजी या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. नियामानुसार एका रुग्णवाहिकेवर एक डॉक्टर, एक चालक आणि एका परिचारकाची आवश्यकता असते. यानुसार जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात आलेल्या २३ रुग्णवाहिकांपैकी ५ रुग्णवाहिका बंद आहेत. सेवेत असलेल्या १८ रुग्णवाहिकांसाठी ३६ डॉक्टर सध्या कार्यरत आहेत. या रुग्वाहिकांचे कामकाज डॉक्टर तीन पाळ्यांमध्ये पाहतात. आठ तासाच्या पाळीनुसार १८ रुग्णवाहिकांसाठी आवश्यक असलेले डॉक्टर सध्या उपलब्ध आहेत. काही ठिकाणी परिचारकाचे काम रुग्णवाहिकेचे चालकच करत असल्याचे कथीतस्तरावर सांगितले जात आहे.
सुरूवातीच्या काळात १०८ रुग्णवाहिकांचा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला. या क्रमांकावर फोन करताच २० ते ३० मिनीटाच्या आत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचून अपघातग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. मात्र अलीकडच्या काळात या रुग्णवाहिका वेळेवर पोहचत नसल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. यामुळे जखमींवर वेळेत उपचार न झाल्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याच्या घटनाही मधल्या काळात घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ही यंत्रणा कार्यक्षमपणे कार्यान्वीत करण्याची गरज आहे. रुग्णवाहिकांच्या समन्वयकांकडून सेवा पुरविण्यास काही कुचराई होत असल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम जिल्हा शल्य चिकित्सकांचे आहे. त्यामुळे कामात हलगर्जी करणाऱ्या रुग्णावाहिकेवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याच्या दृष्टीने जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून पाऊल उचलणे अपेक्षित आहे. जेणेकरून अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर वेळेवर उपचार होऊन त्यांचा जीव वाचू शकेल.
सध्या जिल्ह्यात २३ रूग्णवाहीकांपैकी १८ रुग्णवाहिका सेवेत आहेत. ही जबाबदारी बीव्हीजी या खासगी कंपनीकडे देण्यात आली आहे. यावर जिल्हा शल्य चिकित्सक या नात्याने आपले नियंत्रण आहे. सोबतच ही सेवा योग्य पद्धतीने दिल्या जात आहे.
- डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा शल्य चिकित्सक