बुलडाणा जिल्ह्यात पावसाची ११ टक्के तुट; दुबार पेरणीचे संकट गडद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 12:05 PM2021-07-08T12:05:56+5:302021-07-08T12:06:03+5:30
11% deficit in rainfall in Buldana district : पावसाने अेाढ दिली असून जिल्ह्यातील पावसाची तुट ११ टक्क्यांवर पोहोचली आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या पाच ते सात दिवसापासून पावसाने अेाढ दिली असून जिल्ह्यातील पावसाची तुट ११ टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकण्याची भीती आहे. जून महिन्यातून नऊ दिवस पाऊस पडला आहे तर जुलै महिन्यात साधारणत: १६ दिवस पाऊस पडतो. मात्र जुलै महिन्यातच पावसाने अेाढ दिली आहे. परिणामी खरीप हंगाम धोक्यात आल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७६१.६ मिमी पाऊस पडतो. त्यानुषंगाने ७ जुलै पर्यंत जिल्ह्यात साधारणत: २३३.३ मिमी सरासरी पाऊस पडणे अपेक्षीत होते. मात्र प्रत्यक्षात १३९.३ मिमीच पाऊस पडला आहे. पावसाची वार्षिक सरासरीच्या तुलनेत जवळपास ११ टक्के तुट आहे. त्यातच प्रकल्पांमध्येही सध्या अवघा २७ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा आहेत ते शेतकरी स्प्रींकलरच्या माध्यमातून पीके जगविण्याा प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यातील काही भागा तर पिकांनी आता माना टाकल्याचे एकंदरती चित्र आहे. त्यामुळे आता जर पावसाने आणखी अेाढ दिली तर खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती आहे. पिकांच्या वाढीच्या निर्णायक काळातच पावसाने अेाढ दिली आहे.
३० टक्के पेरण्या रखडल्या
जिल्ह्यात आतापर्यंत ७ लाख ३४ हजार १७७.२२ हेक्टरपेकी ५ लाख १४ हजार ४२ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. एकूण उदिष्ठाच्या त्यात ७० टक्के आहेत. त्यामुळे अद्यापही ३० टक्के क्षेत्रावरील पेरण्या पावसाअभावी रखडल्या आहेत. त्यासाठी आता दमदार पावसाची गरज आहे. अशीच परिस्थिती राहली तर यंदा उत्पादन घटण्याची भीती आहे.