घरावरून गेलेल्या ११ केव्हीच्या लाइन हटविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:24+5:302021-07-10T04:24:24+5:30
चिखली : चिखली उपविभागाअंतर्गत चिखली शहरास दोन ११ के.व्ही.वाहिन्यांद्वारे (११ के.व्ही.चिखली शहर व ११ के.व्ही.केळवद) वीज पुरवठा करण्यात येतो. ...
चिखली : चिखली उपविभागाअंतर्गत चिखली शहरास दोन ११ के.व्ही.वाहिन्यांद्वारे (११ के.व्ही.चिखली शहर व ११ के.व्ही.केळवद) वीज पुरवठा करण्यात येतो. या ११ केव्हीच्या विद्युत वाहिन्या शहरातील अनेक घरावरून जात असल्याने ती लवकरच हटविण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे. त्यामुळे आमदार श्वेता महाले यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे.
विधानसभेच्या दुसऱ्या अधिवेशनात आमदार श्वेता महाले यांनी चिखली शहरातील घरावरून गेलेल्या ११ केव्हीच्या लाइनमुळे जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करून या वाहिन्या तातडीने हटवावी, अशी मागणी केली होती. ११ के. व्ही. चिखली शहर ही वाहिनी गौरक्षणवाडी व इंदिरानगर भागातून आणि ११ के.व्ही. केळवद टाऊन ही वाहिनी अंगूरमळा, सुभाषनगर (पंचायत समिती मागे) या भागातील दाट लोकवस्तीतून जाते. दरम्यान, चिखली शहरामध्ये मागील पाच वर्षांत दोन अप्राणांतिक विद्युत अपघात घडले आहेत. याची दखल घेत शहरातील उपरोक्त नमूद दोन्ही वाहिन्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायमस्वरूपी स्थलांतरित करण्याबाबत आमदार महालेंनी लक्ष वेधले होते. त्यानुषंगाने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलेल्या लेखी आश्वासन दिले हाेते.
वाहिनीचे स्थानांतरण हाेणार
११ के.व्ही. चिखली शहर ही वाहिनी पर्यायी मार्गाने म्हणजेच जाफ्राबादरोड-भंवर हार्डवेअर कब्रस्थान रोहित्र अशी नवीन १ कि.मी. लांबीची लिंक लाइन ही चिखली शहरातील रस्ता रुंदीकरणाचे अनुषंगाने प्रस्तावित असलेल्या वाहिनी स्थानांतरणाचे (युटिलिटी शिफ्टिंग) कामासोबतच प्रस्तावित करण्यात आली आहे. या नवीन लिंक लाइनचे पाच पोलचे काम पूर्ण झाले आहे. काम पूर्ण झाल्यावर ४९ के.व्ही. चिखली शहर वाहिनी गोरक्षणवाडी, इंदिरानगर या भागातून कायमस्वरूपी हटविण्यात येणार आहे.
कामास प्रारंभ
केळवद टाऊन वाहिनी सुद्धा सुरक्षिततेच्या हेतूने पर्यायी मार्गाने टाकण्याचे अंदाजपत्रक नगरपालिका यांनी सुचविलेल्या मार्गाने १०० टक्के 'डीडीएफ' (रिकव्हरेबल) योजनेअंतर्गत अधीक्षक अभियंता, बुलडाणा यांच्याकडून मंजूर करण्यात आले आहे. मंजूर अंदाजपत्रकानुसार महावितरणमार्फत कामास सुरुवात करण्यात आलेली आहे. यानुषंगाने आमदार श्वेता महाले यांनी चालविलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे.