शेअर मार्केटचा तोटा भरून काढण्याच्या नावाखाली ११ लाखाचा गंडा
By ब्रह्मानंद जाधव | Published: August 1, 2023 01:34 PM2023-08-01T13:34:43+5:302023-08-01T13:35:10+5:30
येळगाव येथील शेतकऱ्याची फसवणूक : अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
ब्रह्मानंद जाधव, बुलढाणा : तालुक्यातील येळगाव येथील एका शेतकऱ्याला शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा भरून काढतो म्हणून अज्ञात आरोपीने ११ लाख रुपयांनी ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस स्टेशन बुलढाणा येथे अज्ञात आरोपी विरूद्ध ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
बुलढाणा येथील सायबर पोलिस स्टेशनला अरुण मोतीसिंग राजपूत (वय ४०, रा. येळगाव) यांनी तक्रार दिली आहे. अरूण राजपूत हे शेती करत असून, सोबतच ते ऑनलाइन शेअर मार्केटमध्ये सुद्धा गुंतवणूक करतात. परंतु त्यांचा शेअर मार्केटमध्ये तोटा झाला. दरम्यान, अज्ञात आरोपीने अरुण राजपूत यांना फोनद्वारे संपर्क करून त्यांचा शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा भरून काढतो व नफा करून देतो, असे सांगून वेगवेगळ्या तारखेला पैशाची मागणी केली. यामध्ये एकूण ११ लाख ३३ हजार १५८ रुपये त्यांनी सांगितलेल्या खात्यावर ऑनलाईन भरून घेतले. ट्रेेडींंग करता आणखी पैसे भरण्याकरिता धमक्या देत असल्याने आपली फसवणूक झाली असल्याचा प्रकार अरूण राजपूत यांच्या लक्षात आला. दरम्यान, त्यांनी बुलढाणा येथील सायबर पोलिस ठाणे गाठले. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.