खामगावात १११ ग्रॅम मॅकड्रॉन ड्रग्स पकडले; शहर पोलीसांची धडक कारवाई
By अनिल गवई | Published: August 11, 2023 11:35 AM2023-08-11T11:35:09+5:302023-08-11T11:36:32+5:30
ही कारवाई शुक्रवारी पहाटे करण्यात आली. त्यानंतर सकाळी खामगाव शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव: खामगावात प्रतिबंधित मॅकड्रॉन ड्रग्सची चोरट्या मार्गाने आयात आणि विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती शहर पोलीसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पाळत ठेऊन शहर पोलीसांकडून छापा मारण्यात आला असता, एका भामट्याकडून १११ ग्रॅम मॅकड्रॉन ड्रग्स आणि इतर साहित्य, असा २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी पहाटे करण्यात आली. त्यानंतर सकाळी खामगाव शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी, खामगाव शहरात अवैध ड्रग्स आणि अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी गुजरात राज्यातील सूरत येथील एकजण दाखल झाल्याची गुप्त माहिती शहर पोलीसांना मिळाली. या माहितीची खात्री पटल्यानंतर शहर पोलीसांनी सापळा रचला. खामगाव बसस्थानकावर शब्बीर खान उस्मान खान पठाण (३५) नामक संशयिताची झडती घेण्यात आली असता, त्याच्या जवळून १.५० गन मॅकड्रॉन ड्रग्स किंमत १८ हजार रूपये या अंमली पदार्थासह सहा हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल, िनट्राझेपाम नामक १० मिली ग्रॅमच्या १८ गोळ्या , गुलकोज डी पावडर असा एकुण २५ हजार ५१७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीसांनी ड्रग्सचे वजन काट्यावर वजन केले असता १११ ग्रॅम भरले. याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक पंकज सपकाळे यांनी शहर पोलीसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून आरोपी शब्बीर खान उस्मान खान पठाण याच्या विरोधात एनडीपीएस कायदा कलम ८ क, २१ अ, २२ अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.