जिल्ह्यातील ११२६ रुग्णांना मिळाली उपचाराची 'संजीवनी'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:25 AM2021-06-06T04:25:51+5:302021-06-06T04:25:51+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना संसर्ग झाला हाेता़ अनेकांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले़ खासगी रुग्णलयांमध्ये ...
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना संसर्ग झाला हाेता़ अनेकांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले़ खासगी रुग्णलयांमध्ये महागडे उपचार करताना सर्वसामान्यांसाठी जिकरीचे झाले हाेते़ अशा रुग्णांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेचा आधार मिळाला आहे़ जिल्ह्यातील १२ रुग्णालयांत एकूण ११२६ रुग्णांनी योजनेअंतर्गत उपचाराची संजीवनी मिळाली आहे.
महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना जिल्ह्यात राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबईमार्फत राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत कोविड व नॉन कोविड उपचार रोखरहित पद्धतीने अंगीकृत रुग्णालयातून करण्यात येतात. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यात मेहकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मेहकर, मेहेत्रे हॉस्पिटल बुलडाणा, सिटी हॉस्पिटल बुलडाणा, संचेती हृदयालय हॉस्पिटल बुलडाणा, तुळजाई हॉस्पिटल चिखली, साई बालरुग्णालय बुलडाणा आदी खाजगी कोविड रुग्णालय आहेत. तसेच जिल्हा स्त्री रुग्णालय बुलडाणा, सामान्य रुग्णालय खामगाव, उपजिल्हा रुग्णालय शेगाव, उपजिल्हा रुग्णालय मलकापूर, ग्रामीण रुग्णालय सिंदखेड राजा, ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा अशा एकूण १२ कोविड रुग्णालयांत योजनेअंतर्गत उपचार होतात. या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२० ते ३१ मे २०२१ पर्यंत जिल्ह्यातील १२ रुग्णालयांत एकूण ११२६ रुग्णांना योजनेअंतर्गत उपचाराची संजीवनी मिळाली आहे.
४१६ रुग्णांवर बाहेर जिल्ह्यात उपचार
जिल्ह्यातील ४१६ रुग्णांनी श्वसन विकाराकरिता योजनेअंतर्गत बाहेर जिल्ह्यातदेखील उपचार घेतला आहे. योजनेअंतर्गत रेमडेसेविर व इतर महागड्या इंजेक्शन खर्च योजनेच्या पॅकेजमध्ये समाविष्ट नाही. तो खर्च रुग्णास करावा लागणार आहे़
तक्ररीसाठी हेल्पलाइन
महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना तक्रार नोंदणी व मदत म्हणून टोलफ्री नंबर १५५३८८ आणि १८००२३३२२०० वर संपर्क साधावा. रुग्णालयात प्रवेश घेताच आपणास योजनेचे आरोग्य मित्र कक्ष आहेत. या कक्षातही लिखित स्वरूपात तक्रारी नोंद करता येते. रुग्णालय जर योजनेमध्ये अंगीकृत नसेल तर जिल्हा आरोग्य यंत्रणेचे भरारी पथक यांना आपली तक्रार द्यावी. तसेच बाहेर जिल्ह्यातील खाजगी कोविड हॉस्पिटल असेल तर त्या जिल्ह्यातील भरारी पथकाकडेही तक्रार करता येते़
नॉनकोविड आजारांवर उपचार
महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत नाॅनकाेविड आजारांवरही उपचार करण्यात येतात़ यामध्ये अमृत हृदयालय बुलडाणा, चोपडे हॉस्पिटल मलकापूर, कोलते हॉस्पिटल मलकापूर, मानस हॉस्पिटल मलकापूर, आस्था हॉस्पिटल मलकापूर, सोनटक्के बाल रुग्णालय खामगाव, माउली डायलिसिस सेंटर शेगाव, राठोड हॉस्पिटल मेहकर, धनवे बाल रुग्णालय चिखली, कोठारी हॉस्पिटल चिखली, सिल्व्हर सिटी खामगाव या रुग्णालयांचा समावेश आहे़ तसेच केवळ डायलिसिस रुग्णांकरिता सुविधा ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद व ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल, ता. संग्रामपूर येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे़