११४ विनाअनुदानित शाळा बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:21 AM2017-07-19T00:21:36+5:302017-07-19T00:21:36+5:30
१५ वर्षांपासून विनाअनुदानित उच्च माध्यमिकचे शिक्षक वेतनाविना
बुलडाणा : विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्याची मागणी गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे शिक्षकांचा विनावेतन काम करण्याचा प्रवास संपावा व त्यांना वेतन मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्य. शाळा कृती समितीच्यावतीने आंदोलन पुकारून १८ जुलै रोजी जिल्ह्यातील ११४ विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा १०० टक्के बंद ठेवण्यात आल्या.
राज्यातील २२ हजार ५०० विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षिका बिनपगारी काम करत आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेप्रमाणे उच्च माध्यमिक शाळांचे आॅनलाइन मूल्यांकन २०१४ मध्येच शासनाने केले आहे, तसेच १६ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयाप्रमाणे विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल, असे असतानासुद्धा प्रत्यक्ष अनुदान देऊन पगार चालू करणे तर दुरच; मात्र अद्यापही अनुदान पात्र उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची यादी शासनाने जाहीर केली नाही. यासंदर्भात आतापर्यंत कृती समितीच्यावतीने राज्याध्यक्ष प्रा.तानाजी नाईक यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली सनदशीर मार्गाने जवळपास २०० आंदोलने करण्यात आली आहेत; मात्र त्याच्या या आंदोलनाची दखल शासनाने घेतलेली नाही. २४ जुलै पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनाने निर्णय घेऊन राज्यातील विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळेच्या, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पात्र याद्या घोषित करून त्यांना १०० टक्के अनुदान देण्यात यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य कृती समितीच्यावतीने मागणी करण्यात आली आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्य. शाळा कृती समितीच्यावतीने राज्यभर विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ११४ विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवून शिक्षकांनी या आंदोलनात १०० टक्के प्रतिसाद दर्शवला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचे धरणे
महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्य. शाळा कृती समितीच्यावतीने राज्यभर विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले असून, येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील शिक्षकांनी १८ जुलै रोजी धरणे आंदोलन केले. जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी आपल्या शाळा बंद ठेवून आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. यावेळी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्य. शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष प्रा.गजानन निकम, उपाध्यक्ष प्रा.अमोल डुकरे, सचिव प्रा.सुखदेव सरदार, मनोरमा राठोड तथा विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षक आज ना उद्या पगार मिळेल, या आशेवर गेल्या १५ वर्षांपासून विनावेतन अध्यापनाचे, ज्ञानदानाचे कार्य करत आहेत; मात्र शासनाचे याकडे दुर्लक्षच होत असल्याने विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय बंद ठेवून आंदोलन पुकारावे लागले.
- प्रा.गजानन निकम,
जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समिती, बुलडाणा.