खामगावात १.१९ क्विंटल गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:00 AM2017-10-17T01:00:19+5:302017-10-17T01:01:09+5:30
कारमधून गांजाची तस्करी करणार्यांना शिवाजीनगर पोलिसांनी पकडून त्यांच्याजवळून एक क्विंटल १९ किलो गांजा व कार जप्त केल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वा. दरम्यान रावण टेकडी जवळील टोलनाक्याजवळ घडली. यावेळी कारमधील दोन इसम फरार झाले आहेत. तर दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कारमधून गांजाची तस्करी करणार्यांना शिवाजीनगर पोलिसांनी पकडून त्यांच्याजवळून एक क्विंटल १९ किलो गांजा व कार जप्त केल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वा. दरम्यान रावण टेकडी जवळील टोलनाक्याजवळ घडली. यावेळी कारमधील दोन इसम फरार झाले आहेत. तर दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
येथील शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले यांना कारमधून गांजाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. सदर माहितीवरून त्यांनी जुगनू हॉटेलसमोरील चौफुलीवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. दरम्यान, अकोलाकडून येणारी कार क्रमांक एम.एच. 0२ बी.वाय. ८२२१ ही कार पोलिसांसमोर न थांबता समोर निघून गेली. यावेळी पोलिसांनी सदर कारचा सिनेस्टाईल पाठलाग करून रावण टेकडीजवळील टोल नाक्याजवळ थांबविले. यावेळी पोलिसांना पाहून कारमधील दोघे अज्ञात इसम कार सोडून पसार झाले. तर पोलिसांनी कारमधील अरूणा भगवान जाधव (वय ३५) व उषा राजू साळवे (वय ३0) दोघी रा. वडावे बेलदार ता.मुक्ताईनगर यांची विचारपूस करून कारची तपासणी केली असता, पोलिसांना कारच्या डिक्कीमध्ये कागदात पॅकींग केलेल्या एकूण ५५ पाकिटामध्ये १ क्विंटल १९ किलो गांजा (किं. ३ लाख ५९ हजार ७४४) मिळून आला. यावेळी पोलिसांनी सदर गांजा व कार किंमत चार लाख रुपये असा ऐवज जप्त करून उपरोक्त दोन्ही महिलांना ताब्यात घेतले.
महिलांसोबत एक १0 वर्षांचा मुलगासुद्धा कारमध्ये हजर होता. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी पाटील हे घटनास्थळी हजर झाले. दरम्यान, पळून गेलेल्या दोघांमध्ये भगवान बेलदार रा. वडोदा, ता. मुक्ताईनगर व संतोषभय्या रा. नागपूर यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, पोलिसांचे एक पथक त्यांच्या शोधात मुक्ताईनगरकडे रवाना झाले आहे. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.