संग्रामपूरात १२ बालके कुपोषित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 03:28 PM2019-07-03T15:28:19+5:302019-07-03T15:28:37+5:30
संग्रामपूर तालुक्यात १२ बालके कुपोषित असल्याची माहिती समोर आली आहे.
- नारायण सावतकर
लोकमत न्यूज नेटवर्क
वरवट बकाल : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यात १२ बालके कुपोषित असल्याची माहिती समोर आली आहे. कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यासाठी राज्य शासन नानाविध प्रयत्न करीत असले तरी कुपोषणाचे प्रमाण कमी होईना ही गंभीर बाब आहे.
कुपोषण हा केवळ आदिवासी भागामधील महत्वाचा प्रश्न बनला आहे. प्रशासनातर्फे अद्याप मे महिन्याचा अहवाल तयार झालेला नाही. कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यासाठी आधी सकस आहार खायला दिला जायचा. यामध्ये सुकळी, लापशी, शिरा आदीचा समावेश होता.
आता मात्र मटकी, बरबटी, मसूर दाळ, गहू, तेल, मीठ, हळद हा आहार दिला जात आहे. पूर्वी हा आहार अंगणवाडी मध्ये शिजून दिला जात होता. परंतु आता घरपोच सेवा सुरू करण्यात आली. बालकांना घरी दिल्या जाणाऱ्या या अन्न आहारामध्ये घरातील सदस्य या आहार मध्ये सहभागी होतात. त्यामुळे ज्या बाळासाठी आहार दिला जातो. त्यास पुरेसा सकस आहार मिळत नाही. याबाबत पालकामध्ये जनजागृतीची गरज आहे. आदीवासी भागात तरी किमान घरपोच आहार देण्यापेक्षा त्यांना अंगणवाडीत अन्न शिजून देणे योग्य राहील अशाप्रकारच्या प्रतिक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळत आहेत.
याशिवाय संग्रामपूर येथील बाल विकास प्रकल्प कार्यालयामधील तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी हे पद गेल्या चार वर्षा पासून प्रभारीवरच आहे.
१५ सप्टेंबर २०१५ रोजी तत्कालीन अधिकारी शेवाळे यांची बदली झाली. तेव्हापासून हे पद कायमस्वरुपी भरण्यात आले नाही. त्यामुळे कामकाज प्रभावित झालेले दिसून येत आहे. आतापर्यंत चार अधिकाऱ्यांनी या पदाचा भार सांभाळला. सध्या हे पद शेगाव येथे कार्यरत असलेल्या कर्मचाºयाकडे आहे. शेगाव वरून संग्रामपूर येथील कारभार पाहणे जाधव यांना जिकरीचे ठरत आहे. शेगावचाच व्याप जाास्त असलयाने त्यांना संग्रामपूर तालुक्यासाठी वेळ मिळत नसल्याचे वास्तव आहे.
कुपोषीत बालकांना सुद्ढ होण्यासाठी शासन स्तरावर चांगल्या प्रकारे नियोजनबद्ध योजना राबविल्या गेल्या पाहिजेत. सोबत रिक्त असलेली पदे, कुपोषित बालके असणे ही शोकांतिका आहे. प्रकल्प विभागाने बालकांना वेळोवेळी आहार देणे गरजेचे आहे.
- मीनाक्षी हागे
जिल्हा परिषद सदस्या, बावनबीर