१२ दिवस व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2016 02:12 AM2016-03-29T02:12:48+5:302016-03-29T02:12:48+5:30
चिखली कृउबासतील प्रकारामुळे बळीराजा अडचणीत.
चिखली(जि. बुलडाणा) : शासनाच्या सतत चार दिवस सुट्या संपल्या असल्या, तरी सोमवार, २८ मार्चपासून चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील खरेदी -विक्रीचे व्यवहार ३ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आल्यामुळे सतत १२ दिवस खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहणार आहेत. त्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. होळी, रंगपंचमी, गुडफ्रायडे, चवथा शनिवार व रविवार अशा सलग सुट्या आल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील खरेदी-विक्रीचे व्यवहार बंदच होते व २८ मार्चपासून आर्थिक वर्षाच्या हिशेबासाठी ४ एप्रिलपर्यंत खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद आहेत, त्यामुळे सतत १२ दिवस खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प होणार आहेत. कास्तकाराला आपल्याजवळील शेतमाल विकून ३१ मार्चच्या अगोदर बँकेचे, सोसायटीचे पैसे भरावयाचे आहेत, तेव्हाच शासनाच्या व्याज सवलतीचा लाभ मिळू शकेल; परंतु १२ दिवस कृउबा समितीमधील खरेदी -विक्रीचे व्यवहार ठप्पच असल्यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्याचप्रमाणे लग्नसराई असल्यामुळेदेखील खर्चासाठी पैसा लागतो. आजारपणासाठीदेखील पैसा लागत असतो. हे सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत. दरवर्षी आर्थिक हिशेबासाठी कृउबा समितीमधील व्यवहार मार्च महिन्याच्या शेवटी बंद असतात; परंतु यावेळी आलेल्या शासकीय सुट्या व त्यानंतर आर्थिक ताळेबंदसाठी ठेवण्यात आलेले बंद लागून आल्यामुळे जवळजवळ १२ दिवस व्यवहार ठप्प झाले आहेत.