सैलानी यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या १२५ बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 03:13 PM2019-03-03T15:13:27+5:302019-03-03T15:13:36+5:30
बुलडाणा : सैलानी यात्रेच्या दृष्टीने राज्य परिहवहन महामंडळाच्या बुलडाणा आगाराने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील सात आगारातून यात्रेसाठी १२५ बसेस सोडण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सैलानी यात्रेच्या दृष्टीने राज्य परिहवहन महामंडळाच्या बुलडाणा आगाराने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील सात आगारातून यात्रेसाठी १२५ बसेस सोडण्यात येणार आहेत. यात्रेसाठी येणाऱ्या प्रवासी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यासह देशभरात प्रसिध्द असलेली सैलानी बाबा यात्रा २० मार्चपासून सुरु होत आहे. जवळपास महिनाभर ही यात्रा चालते. राज्यातील ही एक प्रमुख यात्रा आहे. दरवर्षी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक यात्रेसाठी सैलानीत येतात. भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात येते. यंदा २० मार्चपासून सुरु होणारी यात्रा जवळपास १ महिना चालणार आहे. यात्रेचे मुख्य आकर्षण व महत्वाचा दिवस संदल २५ मार्च रोजी राहणार आहे. यात्रेसाठी एसटी महामंडळाने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील ७ आगारातून यात्रेसाठी १२५ बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. बुलडाणा, मेहकर व मलकापूरमधून प्रत्येकी २५, चिखली २३, खामगाव १७, शेगाव ६ तर जळगाव जामोद आगारातून ४ बस सोडण्यात येतील. विभाग नियंत्रक संदीप रायलवार व विभागीय वाहतूक अधिकारी अमृत कच्छवे यांच्या मार्गदर्शनात अधिकारी-कर्मचारी नियुक्ती व वाहतुकीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात्रा प्रमुख म्हणून डीटीओ अमृत कच्छवे व एटीएस व्ही. डी. धायडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना सहायक वाहतूक अधिकारी चंद्रकांत झिने हे मदत करतील. याशिवाय एस. एस. भालेराव हे पिंपळगाव सराई मार्गावरील यात्रा केंद्रावर यात्रा प्रमुख म्हणून काम करतील. त्यांना एस. टी. माने, स्वाती तांबटकर, पी. एन. सावळे हे सहाय करतील. पिंपळगाव सराई बसस्थापनकावर बुलडाणा व चिखली आगाराचे प्रत्येकी २, खामगाव, मेहकर, मलकापूर आगाराचे प्रत्येकी १ तर ढासाळवाडी बसस्थानक येथे जळगाव जामोद आगाराचे ३ वाहतूक नियंत्रक नियुक्त करण्यात आले आहे.
जादा वाहतुकीसाठी आगार व्यवस्थापक हे यात्रा प्रमुख म्हणून काम करणार आहे. धाड येथील वाहतुकीसाठी वाहतूक नियंत्रक ए. एल. दांडगे हे १७ ते २६ मार्चपर्यंत कार्यरत राहतील. करडी फाटा व धाड बायपास येथून कोणत्याही परिस्थितीत जालना व औरंगाबाद विभागाच्या बस धाड बसस्थानकावर येणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहे.