बुलडाणा जिल्ह्यात ‘रोहयो’च्या कामावर १२,५०० मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 10:59 AM2020-06-03T10:59:18+5:302020-06-03T10:59:31+5:30
१,५०० कामे सुरू करण्यात आली असून, या कामावर वर्तमान स्थितीत १२ हजार ५०० मजूर कार्यरत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना संसर्गाच्या साथीतही मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार हमी योजनेतंर्गत जिल्ह्यात ९०० पैकी ५०४ ग्रामपंचायतींच्या अंतर्गत १,५०० कामे सुरू करण्यात आली असून, या कामावर वर्तमान स्थितीत १२ हजार ५०० मजूर कार्यरत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास दोन हाजर मजुरांची संख्या या कामावर अधिक असल्याचे चित्र आहे.
स्थानिक पातळीवरच काम मिळत असल्याने आणि अलीकडील काही वर्षांमध्ये ३२ रुपयांनी मजुरीत वाढ करण्यात आल्याने ग्रामीण भागातील मजूर वर्ग रोहयोच्या कामाला सध्या पसंती देत असल्याचे चित्र आहे.
प्रामुख्याने एकट्या मेहकर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीच्या अंतर्गत सुरू असलेल्या कामावर २ हजार मजूर कार्यरत असून, चिखली तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतीच्या अंतर्गत १ हजार ८४ मजूर काम करत आहे. मजुरांच्या स्थलांतराच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या लोणार तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीमध्ये ६२४ मजूर कार्यरत असल्याचे चित्र आहे. जळगाव जामोद, मोताळा, खामगाव, बुलडाणा आणि मलकापूर तालुक्यात ८७६ ते ७०० मजूर सरासरी ५० ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या कामावर कार्यरत आहेत.
जिल्ह्यातील ५०४ ग्रामपंचायतींमध्ये ही कामे सुरू आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीसह विविध प्रशासकीय कार्यालयाच्या अखत्यारीतील ही कामे या अकुशल मजुरांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाचा उद्रेक पाहता शारीरिक अंतरही या कामावर योग्य पद्धतीने पाळल्या जात असल्याचे सुत्रांनी सांगितले. कामे मिळत असल्याने स्थलांतरही कमी झाले आहे.
नरेगातंर्गत ग्रा.पं.नी कामे सुरू करण्यास प्राधान्य द्यावे
कोरोना संसर्गाची परिस्थिती आणि तोंडावर आलेला मान्सून पाहता ग्रामपंचायतींनीही त्यांच्या अधिनस्थ असलेली कामे सुरू करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सुचनाच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी अद्याप कामांना प्रारंभ केला नसल्याचे जिल्हा परिषदेतंर्गत असलेल्या नरेगा कक्षाच्या निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांनी या सुचना दिल्या आहेत.
मलकापुरातील अंकेक्षण रखडले!
यावर्षी मलकापूर तालुक्यात रोजगार हमी योजने अंतर्गत होत असलेल्या कामाचे व आतापर्यंत झालेल्या एकूण खर्चाच्या संदर्भाने सामाजिक अंकेक्षण करण्यात येणार होते. यात मजुरांच्या एकंदर स्थितीचीही पाहणी करण्यात येऊन त्यांचे म्हणणे ही विचारात घेतले जात असते. मधल्या काळात लोणार तालुक्यात झालेले सामाजिक अंकेक्षण चांगलेच गाजले होते. त्यावेळी १७ हजार मजुरांकडून काम मागणीचे अर्ज भरून घेतले होते.
जिल्ह्यात १२,५०० मजूर प्रत्यक्षात या कामावर कार्यरत असून, यातील १ हजार २९४ मजुरांकडे अद्यापही युनिक आयडेंटी कार्ड नसल्याचे समोर येत आहे; मात्र जिल्ह्यातील अकुशल मजुरांना कोरोना संसर्गाच्या काळात काम मिळाल्यामुळे त्यांच्या मजुरीचाही प्रश्न निकाली निघाला आहे.