पाच महिन्यांत घेतले १२ हजार ५०० स्वॅब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:31 AM2021-03-08T04:31:51+5:302021-03-08T04:31:51+5:30
संदीप वानखडे बुलडाणा : काेराेनाचे संकट जगभरात आल्यानंतर त्याची भीती वाढली हाेती. संसर्गजन्य आजार असल्याने वैद्यकीय क्षेत्रातील अनेकजण त्यापासून ...
संदीप वानखडे
बुलडाणा : काेराेनाचे संकट जगभरात आल्यानंतर त्याची भीती वाढली हाेती. संसर्गजन्य आजार असल्याने वैद्यकीय क्षेत्रातील अनेकजण त्यापासून दूरच राहण्याचा प्रयत्न करीत हाेते. बुलडाण्यात काेराेना संसर्ग वाढत असल्यामुळे स्वॅब घेण्याची जबाबादारी स्वीकारण्यास अनेकांची नकारघंटा असताना डाॅ. गार्गी हर्षवर्धन सपकाळ हिने ही जबाबदारी स्वीकारली आणि यशस्वीपणे सांभाळली. पाच महिन्यांत तिने १२ हजार ५०० स्वॅब घेतले.
मार्च २०२० मध्ये बुलडाणा जिल्ह्यात काेराेनाचा संसर्ग वाढू लागला हाेता. दरराेज माेठ्या प्रमाणात रुग्ण निघत असल्याने सर्वसामान्यांनी काेराेनाची धास्ती घेतली हाेती. काेराेना संदिग्धांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी अनेक जण तयार हाेत नव्हते. स्वॅब घेणे म्हणजे पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात येणे हाेते. पीपीई किट असली तरी अनेकांना भीती हाेती. तसेच दिवसभर पीपीई किट परिधान करून राहिल्यानंतर त्याचाही त्रास सहन करावा लागत हाेता. दंत महाविद्यालये बंद असल्याने काेराेना महामारीतही आपले काहीतरी याेगदान असावे, यासाठी डाॅ. गार्गी सपकाळ यांनी सेवा देण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक प्रेमचंद पंडित यांनी डाॅ. गार्गी सपकाळ यांना स्वॅब कलेक्शनची जबाबदारी दिली. ही जबाबदारी आनंदाने स्वीकारत त्यांनी २९ एप्रिल २०२० ते २९ सप्टेंबर २०२० या पाच महिन्यांत तब्बल १२ हजार ५०० स्वॅब घेतले. काेरोना महामारीच्या काळातही त्यांनी कुठलाही माेबादला न घेता ही कामगिरी बजावली.
काही महिन्यांने डाॅक्टर हाेणार असताना या महामारीच्या काळात आपलेही याेगदान असावे,असे वाटले. मी स्वत: शल्यचिकित्सकांना फाेन करून काही सेवा देऊ शकते का असे विचारले. त्यांनी स्वॅब घेण्याची जबाबदारी दिली. स्वॅब घेत असताना काेराेनाची भीती वाटली नाही. आत्मविश्वास वाढत गेला. काेराेनाच्या काळात दिलेल्या सेवेतून खूप काही शिकायला मिळाले.
डाॅ. गार्गी सपकाळ, बुलडाणा