खळेगावात सव्वाकिलो गांजा पकडला; एकाला अटक, गुटख्याच्या ६०० पुड्याही जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 08:39 PM2020-02-22T20:39:59+5:302020-02-22T20:40:08+5:30
बिबी पोलिसांनी बारकाईने झडती घेऊन हा गांजा जप्त केला.
बुलडाणा: लोणार तालुक्यातील खळेगाव येथे बिबी पोलिसांनी छापा टाकून एक किलो ३४५ ग्रॅम वजनाचा १६ हजार १४० रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. ठाणेदार एपीआय सचिन यादव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर बिबी पोलिसांनी ही धडक कारवाई केली. विशेष म्हणजे आरोपीने त्याच्या घराच्या तिस-या मजल्यावर हा गांजा लपवून ठेवला होता.
मात्र, बिबी पोलिसांनी बारकाईने झडती घेऊन हा गांजा जप्त केला. सोबतच गुटख्याचे दहा मोठे पुडे की ज्यात ६०० गुटख्याच्या पुड्या होत्या त्याही जप्त केल्या आहेत. देऊळगाव राजाचे उपविभागीय पोलिस अधिकारी भिमानंद नलावडे हे ही या कारवाईमध्ये सहभागी झाले होते. बिबी पोलिस ठाण्याच्या परिसरात अवैध व्यवसायांना बंदी घालण्यासोबतच गुटख्याची अवैध विक्री रोखण्यासाठी बिबी पोलिसांनी गेल्या काही काळापासून धडक पावले उचलली असून त्यातंर्गतच खब-यांचे स्ट्राँग नेटवर्क येथे तयार झाले असून त्यामुळेच खळेगाव येथे गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने एपीआय सचिन यादव यांच्या नेतृत्त्वात नायक पोलिस कॉन्स्टेबल टेकाळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पवार, दीपक परसुवाले, महिला कॉन्स्टेबल बित्रे, नायमने, शेख रहीम, गवई यांनी आरोपी संतोष रावबा नागरे यांच्या घरात हा छापा टाकला. आरोपीचे दुकान आहे.
यावेळी आरोपीच्या घरात व दुकानात छडती घेण्यात आली असता घराच्या तिसºया मजल्यावर लपवून ठेवलेला एक किलो ३४५ ग्रॅम गुटखा पोलिसांना मिळून आला. प्रकरणी दुपार पासून ते सायंकाळी सहा पर्यंत या ठिकाणी अधिक बारकाईने बिबी पोलिसांनी झडती घेऊन हा १६ हजार १४० रुपयांचा गांजा जप्त केला. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या नेतृत्त्वात ही कारवाई करण्यात आली. प्रकरणी आरोपी संतोष रावबा नागरे यास बिबी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुटखाही जप्त
या कारवाईसोबतच बिबी पोलिसांनी आरोपी संतोष रावबा नागरे यांच्या घरातून गुटख्याचे दहा पुडे जप्त केले. त्यातील पुड्यांची सायंकाळी उशिरापर्यंत मोजदाद सुरू होती. या गुटख्याची रक्कमही अधिक असल्याची माहिती असून त्याची किंमत मात्र समजू शकली नाही.