१२९२ मोबाईल केले प्रशासनास परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:39 AM2021-08-21T04:39:42+5:302021-08-21T04:39:42+5:30
अंगणवाडी कर्मचारी युनियन बुलडाणा शाखेच्या वतीने १७ ऑगस्ट रोजी या मागणी संदर्भात जिल्हा परिषद कार्यालयासमोर प्रचंड आंदोलन करण्यात ...
अंगणवाडी कर्मचारी युनियन बुलडाणा शाखेच्या वतीने १७ ऑगस्ट रोजी या मागणी संदर्भात जिल्हा परिषद कार्यालयासमोर प्रचंड आंदोलन करण्यात आले होते. त्यात मोबाईल वापसीचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. दरम्यान २० ऑगस्ट रोजी मेहकर येथे अंगणवाडी सेविकांनी प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सदर मोबाईल परत करून मोबाईल वापसी आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे असून, त्याची रॅम कमी आहे. काम करताना मोबाईल सतत हॅंग होतो, बंद पडून गरम होतो. त्यामुळे काम करणे अवघड झाले आहे. तसेच मोबाईल दुरूस्तीसाठी सात ते आठ हजार रूपये खर्च होतो. अंगणवाडी सेविकांची परिस्थिती नसताना तो खर्च करावा लागतो. यासंदर्भात कार्यालयाला व जिल्हा परिषद प्रशासनास वेळोवेळी सूचना देऊन ही त्याची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप ही अंगणवाडी सेविकांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आंदोलनाची व्याप्ती वाढवून अखेर २० ऑगस्ट रोजी मेहकर तालुक्यातील भाग एक व दोन अंगणवाडी सेविकांनी समोर एकत्रित येऊन आपले मोबाईल प्रकल्प अधिकाऱ्यांकडे वापस केले आहेत. आंदोलनात संघटनेच्या राज्य उपसचिव अलका राऊत, तालुकाध्यक्ष सुषमा घोडके, सचिव वंदना गायकवाड यांचेसह अन्य अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.