१३ लाख नागरिक साथरोगाने बाधित
By admin | Published: May 12, 2017 08:02 AM2017-05-12T08:02:12+5:302017-05-12T08:02:12+5:30
साथरोग नियंत्रण कार्यक्रम ; ४३ नागरिकांचा मृत्यू.
नीलेश शहाकार
बुलडाणा : गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, काविळ आणि विषमज्वरसारख्या साथरोगाची राज्यात गतवर्षभरात १२ लाख ९६ हजार लोकांना लागन झाली, तर उपचाराअभावी ४३ नागरिकांचा मृत्यू झाला, त्यामुळे शासनाच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत असलेला साथरोग नियंत्रण कार्यक्रम अयशस्वी होत असल्याचे चित्र आहे.
मान्सूनपूर्व कालावधीत साथरोग उद्भवल्यास यावरती तत्काळ नियंत्रण आणण्यासाठी तसेच पावसाळा कालावधीत ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याकरिता उपाययोजना करण्यात येते. आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हा परिषद, नगर परिषद आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हे नियोजन राबविण्यात येते.
प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येते. प्रत्येक नियंत्रण कक्षात कर्मचारी नियुक्त करण्यात येऊन या कर्मचाऱ्यांमार्फत आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांवर लक्ष ठेवले जाते.
सर्व स्थानिक प्रशासनाने पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता करावी. पाणीपुरवठा स्रोतांचा परिसर स्वच्छ ठेवाण्यासंदर्भात सूचना देण्यात येते. पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरिनयुक्त टीसीएल पावडरचा पुरवठा करण्यात येतो; मात्र इतर आरोग्य कार्यक्रमाप्रमाणे साथरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही किंवा आरोग्य कर्मचारी पदनिर्मिती नाही. या कार्यक्रमात जिल्हा आरोग्य विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, कीटकजन्य आजार आणि हिवताप विभागातील कर्मचारी काम करतात. त्यामुळे कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे कार्यक्रम अयशस्वी होत असल्याचे चित्र आहे.