राज्यातील १.३० लाख विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 03:06 PM2019-11-19T15:06:07+5:302019-11-19T15:06:13+5:30
८ हजार ४६६ शाळांमधील एकूण १ लाख ३० हजार ६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
बुलडाणा: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी ८ डिसेंबर रोजी शिष्यवृत्तीपरीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील एकूण ८ हजार ४६६ शाळांमधील एकूण १ लाख ३० हजार ६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत घेण्यात येणारी इयत्ता आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा ८ डिसेंबर रोजी होत आहे. २०१७-०८ पासून इयत्ता आठवीतील नियमित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना तसेच त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. शासनमान्य, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील इयत्ता आठवीतील नियमित विद्यार्थीच राज्याने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येतात. या परीक्षेसाठी बसणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन आवेदनपत्रे शाळांसाठी ३० आॅगस्टपासून परीक्षा परीषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली होती. दरम्यान, राज्यातील एकूण ३७७ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातील एकूण ८ हजार ४६६ शाळांमधून एकूण १ लाख ३० हजार ६३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
१५ नोव्हेंबरपासून प्रवेशपत्र
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेलया विद्यार्थ्यांची प्रवशेपत्रे १५ नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहेत. शाळांना विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.