बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १३.४६ टक्केच जलसाठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:02 AM2018-03-06T01:02:15+5:302018-03-06T01:02:15+5:30
बाष्पीभवनामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. परिणामी, भविष्यात अनेक गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. आज रोजी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १३.४६ टक्के जलसाठा आहे. आज रोजी या प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट झाल्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे.
हर्षनंदन वाघ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे अनेक नदी, नाले तसेच प्रकल्पात अत्यल्प जलसाठा होता; मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा फटका बसण्यास सुरुवात झाली असून, बाष्पीभवनामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. परिणामी, भविष्यात अनेक गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. आज रोजी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १३.४६ टक्के जलसाठा आहे. आज रोजी या प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट झाल्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यात यावर्षी पावसाळा समाधानकारक झाल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी प्रमाणात वाढली होती. तर जिल्ह्यातील सर्वच जलसाठ्यात कमी जास्त प्रमाणात वाढ झाली होती, त्यामुळे पावसाळ्याच्या शेवटी काही गावात पाणीटंचाई जाणवू लागली होती; मात्र मागिल एका आठवड्यापासून विविध प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या तीन मोठ्या प्रकल्पात आठ दिवसांपूर्वी १०.५३ टक्के जलसाठा होता. आता १०.२० टक्के जलसाठा आहे, तर पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या सात मध्यम प्रकल्पात आठ दिवसांपूर्वी २२.३२ टक्के जलसाठा होता. आता २१.१७ टक्के जलसाठा आहे. याशिवाय जिल्ह्यात ८१ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये आठ दिवसांपूर्वी १२.५५ टक्के जलसाठा होता. आता ११.६० टक्केच जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत. यापैकी नळगंगा प्रकल्पात उपयुक्त ६९.३२ दलघमी साठ्याच्या तुलनेत १२.९२ जलसाठा आहे. ही १८.६४ टक्केवारी आहे. पेनटाकळी प्रकल्पात उपयुक्त ५९.५७ दलघमी जलसाठ्याच्या तुलनेत १०.५३ दलघमी जलसाठा आहे. ही १७.५६ टक्केवारी आहे. तर खडकपूर्णा प्रकल्प कोरडा पडला आहे.
एप्रिल-मे महिन्यात तीव्र पाणीटंचाईचे संकेत!
यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मार्च महिन्यातच जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत असून, वातावरणातील बदलाचाही मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे, त्यामुळे भविष्यात अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाईचे संकेत आहेत. आज रोजी जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम, सात महामंडळ व ८१ लघुप्रकल्प असे एकूण ९१ प्रकल्पांमध्ये आठ दिवसांपूर्वी १४.२० टक्के जलसाठा होता. आता एकूण १३.४६ टक्के जलसाठा आहे. यावरून प्रकल्पात झपाट्याने घट होताना दिसून येत आहे.
पाणी बचतीच्या विविध योजना राबविण्याची गरज
जिल्ह्यातील प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत असून, विविध गावांना पाणी पुरवठा करणाºया योजनेच्या घशाला कोरड पडत आहे. यासाठी पाणी बचतीच्या योजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.