१३८ गावांनी कोरोनाच्या दोन्ही लाटा थोपविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:33 AM2021-05-24T04:33:24+5:302021-05-24T04:33:24+5:30
बुलडाणा : कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी १४ महिन्यांच्या अविरत परिश्रमांनंतर काहीशी थकलेली प्रशासकीय यंत्रणा पुन्हा जोरकस प्रयत्न करीत आहे. ...
बुलडाणा : कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी १४ महिन्यांच्या अविरत परिश्रमांनंतर काहीशी थकलेली प्रशासकीय यंत्रणा पुन्हा जोरकस प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील १३८ गावांनी कोरोनाची पहिली व दुसरी लाट थोपविण्याची किमया साधली आहे. विशेष म्हणजे पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत तब्बल साडेसहा पट रुग्ण जिल्ह्यात वाढलेले असतानाही दोन्ही लाटांदरम्यान आपले गाव सुरक्षीत ठेवणाऱ्या या गावांच्या यशाचे नेमके गमक आज यंत्रणांनीही जाणून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पहिल्या लाटेत जिल्ह्यात १२ हजार २१७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. दुसऱ्या लाटेत हाच आकडा वाढून ८२ हजार ३३६ च्या घरात गेला. कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढून बाधितांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात व्यस्त असलेल्या प्रशासकीय यंत्रणेने तब्बल १४ लाख ८२ हजार नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी मोठी यंत्रणाही उभारली. या १३८ गावांतील जनसमुदायाने संक्रमित शहरी तथा ग्रामीण भागातील काही मोठ्या गावांपासून स्वत:ला दूर ठेवल्याने त्यांना दोन्ही लाटा थोपविण्यात यश आले. हेच त्यांचे या यशाचे मोठे गमक म्हणावे लागले.
त्यामुळे तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना या गावांनी जाणीवपूर्वक म्हणा किंवा आपसूकच म्हणा आचरणात आणलेल्या जीवनपद्धती व त्यांच्या दैनंदिन व्यवहारावर घातलेल्या मर्यादांचाही या निमित्ताने महसूल, आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांनी अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे. या गावांनी प्रशासनाने दिलेल्या त्रिसूत्रीचे प्रामाणिकपणे पालन केल्यामुळेच ही गावे आज या संसर्गापासून दूर असल्याचे जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. त्याला विविध बाबींची तथा कारणांची किनारही असेल; पण कोरोना संसर्गाच्या या आपत्तीत या गावांनी एक वेगळा आदर्श आतापर्यंत तरी निर्माण केलेला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
चार तालुक्यांतील गावांचे योगदान मोठे
बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संग्रामपूर, जळगाव जामोद या दोन तालुक्यांतीलच तब्बल ५४ गावांचा यात समावेश आहे. अर्थात कोरोनाला दोन्ही लाटांमध्ये थोपविणाऱ्या १३८ गावांच्या टक्केवारीत या दोन्ही तालुक्यांतील तब्बल ४० टक्के गावांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ खामगाव तालुक्यातील १६ आणि मेहकर तालुक्यातील १२ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १४१९ गावांपैकी १,२८१ गावांना जे जमले नाही ते या दहा टक्के गावांनी प्रत्यक्षात उतरविले आहे.
या गावांचा अभ्यास करण्याची गरज
दोन्ही लाटांना थोपविणाऱ्या या १३८ गावांचे सर्वेक्षण करून त्यांनी नेमकी कोणती पद्धत अवलंबिली याचा अभ्यास करून त्याचा एक पॅटर्न निर्माण करण्याची आज आवश्यकता आहे. त्यादृष्टीने पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे. मात्र, असे करताना या गावात सर्वेक्षणासाठी जाणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणीही प्रथमत: करून नंतरच त्यांना पाठविणे गरजेचे ठरेल.
--दोन्ही लाटा थोपविणारी गावे--
बुलडाणा :- ९
चिखली :-९
दे.राजा :- ३
सि. राजा :- ३
लोणार :-९
मेहकर :-१२
खामगाव :-१६
शेगाव :- ३
संग्रामपूर :-२९
जळगाव जामोद :- २५
नांदुरा :- ६
मोताळा :- ६
मलकापूर :- ८
एकूण-१३८