बुलडाण्यातील १३८ गावांनी कोरोनाच्या दोन्ही लाटा रोखल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 10:45 AM2021-05-24T10:45:13+5:302021-05-24T10:45:26+5:30
Corona Cases in Buldhana : या गावांच्या यशाचे नेमके गमक शोधून त्याचा ‘पॅटर्न’ विकसित होण्याची गरज आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनापासून बचावासाठीच्या त्रिसूत्रीचे अत्यंत काटेकोर पालन करीत बुलडाणा जिल्ह्यातील १३८ गावांनी कोरोनाची पहिली व दुसरीही लाट थोपविण्याची किमया साधली आहे. विशेष म्हणजे पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात तब्बल साडेसहा पट रुग्ण वाढलेले असतानाही, दोन्ही लाटांदरम्यान आपली वेस सुरक्षित ठेवण्यात या गावांनी यश मिळवले. त्यामुळे या गावांच्या यशाचे नेमके गमक शोधून त्याचा ‘पॅटर्न’ विकसित होण्याची गरज आहे.
१४ महिन्यांच्या अविरत परिश्रमांनंतर दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झालेली दिसते. प्रशासकीय यंत्रणा काहीशी थकलेली असली तरी, तिसरी लाट थोपविण्यासाठी पुन्हा जोरकस प्रयत्न करीत आहे. पहिल्या लाटेत जिल्ह्यात १२ हजार २१७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. दुसऱ्या लाटेत हाच आकडा वाढून ८२ हजार ३३६ च्या घरात गेला.
संसर्गाची व्याप्ती वाढून बाधितांच्या जवळून संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात व्यस्त असलेल्या प्रशासकीय यंत्रणेने तब्बल १४ लाख ८२ हजार नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
या गावांनी जाणीवपूर्वक किंवा आपसूकच आचरणात आणलेली जीवनपद्धती व आपल्या दैनंदिन व्यवहारावर घातलेल्या मर्यादांचा महसूल, आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांनी अभ्यास केल्यास, त्याचा तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना उपयोग होऊ शकतो.
या गावांनी प्रशासनाने दिलेल्या त्रिसूत्रीचे प्रामाणिकपणे पालन केल्यामुळेच ही गावे आज या संसर्गापासून दूर असल्याचे जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
चार तालुक्यांतील गावांचे योगदान मोठे
बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संग्रामपूर, जळगाव जामोद या दोन तालुक्यांतील ५४ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले. कोरोनाला दोन्ही लाटांमध्ये थोपविणाऱ्या १३८ गावांपैकी तब्बल ४० टक्के गावे या दोन तालुक्यांतील आहेत. त्यापाठोपाठ खामगाव तालुक्यातील १६ आणि मेहकर तालुक्यातील १२ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १४१९ गावांपैकी १,२८१ गावांना जे जमले नाही, ते या दहा टक्के गावांनी प्रत्यक्षात उतरविले आहे.
‘पॅटर्न’चा अभ्यास करण्याची गरज
या १३८ गावांचे सर्वेक्षण करून त्यांचा ‘पॅटर्न’ निर्माण करण्याची गरज बोलून दाखवण्यात येत आहे. त्यादृष्टीने पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केली. मात्र, या गावात सर्वेक्षणासाठी जाणाऱ्यांची आधी आरटीपीसीआर चाचणी करून नंतरच त्यांना पाठवावे, असे ते म्हणाले.
कोरोनाच्या उद्रेकापासून ही १३८ गावे दूर आहेत. यातील काही गावे दुर्गम भागात आहेत. आतापर्यंत कोरोनाला रोखण्यात या गावांना यश येणे, ही समाधानाची बाब आहे
- भाग्यश्री विसपुते,
सीईओ, जिल्हा परिषद