१४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: April 2, 2016 12:50 AM2016-04-02T00:50:02+5:302016-04-02T00:50:02+5:30
साखरखेर्डा येथील घटना; माहेरच्या मंडळीकडून सासरकडील मंडळीस मारहाण.
साखरखेर्डा (जि. बुलडाणा) : साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत रानअंत्री येथील सासरकडील मंडळीकडून मुलीला शारीरिक व मानसिक त्रास होत असल्याच्या कारणावरून माहेरकडील मंडळीने रानअंत्री येथे येऊन एकास मारहाण केली. त्यावरून साखरखेर्डा पोलिसांनी १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रानअंत्री येथील उकंडा झाल्टे यांच्या लहान मुलाला वाशिम जिल्ह्यातील किनखेडा येथील भास्कर नामदेव अवचार यांची मुलगी दिली होती. लग्नाला ८ वर्ष झाली. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोन वर्षांपासून मुलीचा सतत शारीरिक व मानसिक छळ होत होता. मुलीला सतत त्रास होत असल्याने भास्कर अवचार यांनी नात्यातील काही मंडळी जमवून उकंडा झाल्टे आणि त्यांच्या मुलाला समजाविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्या दोघात कौटुंबीक खटके उडत गेले. १५ दिवसांपूर्वी विवाहित महिलेने पती, सासरा, सासू, दीर यांच्या विरुद्ध तक्रार दिली होती. ती तक्रार पोलिसांनी चौकशीवर ठेवून समोपचाराने प्रकरण मिटविण्यासाठी महिला दक्षता विभागाकडे वर्ग केले. बुधवारी एम.एच.३७ ए.२७७0 आणि एम.एच.३७ जी-९७१३ या वाहनातून विवाहित महिलेचे वडील भास्कर नामदेव अवचार रा.निमखेडा, गोपाल प्रकाश पारीसकर चिखली, ता.रिसोड, दिनकर शिवाजी अवचार, पंजाब पांडुरंग अवचार, चंद्रकांत प्रभाकर जाधव, प्रकाश बाबूराव अवचार आणि इतर ७ ते ८ व्यक्ती रानअंत्री येथे आले आणि गजानन उकंडा झाल्टे यांच्या शेतात जावून गजानन झाल्टे यास भावजयीस त्रास का देतो, म्हणून स्टम्प, हॉकी स्टीक व काठय़ाने मारहाण करून जखमी केले. गजानन उकंडा झाल्टे यांच्या फिर्यादीवरून ठाणेदार नीलेश ब्राम्हणे यांनी कलम १४७, १४८, १४९, ३२४, ५0४, ५0६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉं संजय कोल्हे, पो.काँ. सुभाष म्हस्के, गणेश गाभणे करीत आहेत.