ओव्हरलोड मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना १४ लाखांचा दंड, उपप्रदेशिक परिवहन विभागाची कारवाई

By योगेश देऊळकार | Published: September 27, 2022 02:18 PM2022-09-27T14:18:19+5:302022-09-27T14:19:21+5:30

Buldana News: बुलडाणा जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने पाच महिन्यांत ओव्हरलोड मालवाहतूक करणाऱ्या १३८ वाहनांची तपासणी करण्यात आली. यापैकी दोषी आढळून आलेल्या ४६ वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला

14 lakhs fine to the vehicle owners carrying overloaded goods, action of sub-regional transport department | ओव्हरलोड मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना १४ लाखांचा दंड, उपप्रदेशिक परिवहन विभागाची कारवाई

ओव्हरलोड मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना १४ लाखांचा दंड, उपप्रदेशिक परिवहन विभागाची कारवाई

googlenewsNext

- योगेश देऊळकार
खामगाव : बुलडाणा  जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने पाच महिन्यांत ओव्हरलोड मालवाहतूक करणाऱ्या १३८ वाहनांची तपासणी करण्यात आली. यापैकी दोषी आढळून आलेल्या ४६ वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. याप्रकरणी वाहनधारकांकडून १३ लाख ९१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मालवाहू वाहनधारकांकडून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करण्यात येते. ही वाहने अपघातास कारणीभूत ठरत असून, यामुळे संबंधित वाहनासह रस्त्यावर धावणाऱ्या इतरही वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अशा वाहनांमुळे जिल्ह्यात काही वाहनधारकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही गत दोन वर्षांत घडल्या आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाकडून लक्ष ठेवण्यात येते. याअंतर्गत एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत जड वाहनांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यादरम्यान ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनांच्या मालकांना दंड ठोठावण्यात आला. यामध्ये ट्रक, टिप्पर, ४०७ व इतर छोट्या-मोठ्या वाहनांचा समावेश आहे. नवीन वाहतूक नियमानुसार दंडाची रक्कम वाढविण्यात आली असली तरी नियम मोडणाऱ्या वाहनधारकांचे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र आहे.

कारवाईसाठी भरारी पथक
जड वाहनांच्या तपासणीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून अधिकाऱ्यांचे भरारी पथक नियुक्त करण्यात आले होते. प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. यामध्ये एप्रिल अर्चना घनवट, मे संदीप तायडे व राजेंद्र नाईक, जून संदीप पवार व अभिषेक अहिरे, जुलै विवेक भंडारे व अर्चना घनवट तर ऑगस्ट महिन्यात राजेंद्र निकम व विवेक भंडारे यांनी वाहनांची तपासणी केली.
 
ओव्हरलोड वाहतूक केल्यास असा होतो दंड
मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केल्यास कमीत कमी २० हजार व प्रती टन ४ हजार रुपये दंड आकारण्यात येतो. हा दंड सर्वच प्रकारच्या वाहनांसाठी सारखा असून, चालक व मालकांना एकत्रिरीत्या भरावा लागतो. वाहनाच्या प्रकारानुसार मालवाहतुकीची क्षमता ठरवून देण्यात आली आहे.
 
वसूल करण्यात आलेला महिनानिहाय दंड
एप्रिल : ३,७६,५००
मे : ३,४५,०००
जून : २, ८६,०००
जुलै : ३,२८,०००
ऑगस्ट : ५६,०००
एकूण : १३,९१,५००
 
सुरक्षेच्या दृष्टीने घालून दिलेल्या वाहतूक नियमांचे वाहनधारकांनी पालन करावे. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर वाहतुकीच्या नवीन नियमानुसार दंड आकारण्यात येईल. जड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करून स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालू नये.
- प्रसाद गाजरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलडाणा.

Web Title: 14 lakhs fine to the vehicle owners carrying overloaded goods, action of sub-regional transport department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.