दमदार पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील १४० टँकर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 03:39 PM2019-07-09T15:39:03+5:302019-07-09T15:39:08+5:30
बुलडाणा : दमदार पावसामुळे जिल्ह्यातील टँकरच्या संख्येत घट झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : दमदार पावसामुळे जिल्ह्यातील टँकरच्या संख्येत घट झाली आहे. १२२ गावांची टँकरवरील पिण्याच्या पाण्याची भीस्त समाप्त झाली असून जिल्ह्यातील १४० टँकर बंद करण्यात आले आहेत.
उन्हाळ्यात जिल्हा वासियांनी भिषण पाणीटंचाईला तोंड दिले. या भिषण पाणीटंचाईच्या काळात शासन व प्रशासन जिल्हावासियांना कुठल्याही परिस्थितीत पाणी देण्यासाठी प्रयत्नरत होते. त्यामधून पाणी टंचाई कृती आराखड्यातील गावांमध्ये विविध उपाययोजना सुरू झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील सरपंचांशी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संवादही साधला. त्यामुळे टंचाईच्या काळातील संबंधीतांच्या गावांतील समस्या सोडविण्यास मदत झाली. जिल्हाभर गत काही दिवसांमध्ये गाळ काढणे, नाला रूंदीकरण व खोलीकरण, नदीतील डोहांचे खोलीकरण, जलाशयांना गाळ मुक्त करण्याचे काम जलसंधारण, कृषि, सिंचन व भारतीय जैन संघटना यांच्या माध्यमातून झाले. त्यासोबतच सिमेंट नाला बांध, साखळी बांध, माती नाला बांध, समतल चर, गॅबीयन बंधारे, पाझर तलाव दुरूस्ती, संग्राहक तलाव आदी कामे करण्यात आली. या प्रभावी कामांमुळे पडलेल्या दमदार पावसाचे पाणी जमिनीत मुरले. परिणामी, अनेक गावांमधील कोरडे पडलेले पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत जलयुक्त झाले. जलसंधारणाची कामे व दमदार पावसामुळे ३०० गावांमध्ये ३२४ पर्यंत पोहोचलेला टँकरचा आकडा खाली येण्यास सुरूवात झाली.
सद्यस्थितीत भूजल पातळी सुधारल्यामुळे, कोरडे पडलेले जलाशय पाण्याने भरल्यामुळे १२२ गावांची टँकरवरील भिस्त समाप्त झाली आहे. तब्बल १४० टँकर बंद करण्यात आले आहेत. कृती आराखड्यानुसार टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या प्रस्तावित उपाययोजना २५९ गावांमध्ये होत्या. मात्र मागणीनुसार ३०० गावांमध्ये ३२४ टँकरचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले व या गावांना पाणी पुरवठा करण्यात आला.
सद्यस्थितीत अजूनही १८४ गावांमध्ये १८४ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहील्यास या गावांमधील टँकरही बंद होतील.
तालुकानिहाय गावांना मंजूर टँकर, बंद करण्यात आलेली टँकरची संख्या
बुलडाणा तालुक्यात ३६ गावांमध्ये ४९ टँकर मंजूर करण्यात आले होते. सध्या २९ गावांतील ४० टँकर बंद करण्यात आलेले आहेत. चिखली तालुक्यात ३० गावांमध्ये ३० टँकर मंजूर होते. त्यापैकी १२ गावातील १३ टँकर बंद करण्यात आले. देऊळगाव राजा तालुक्यात २९ गावामध्ये ३१ टँकर मंजूर होते, त्यातील दोन गावातील तीन टँकर बंद झाले. मेहकर तालुक्यात २७ गावांमध्ये ३० टँकर मंजूर, सध्या नऊ गावांतील नऊ टँकर बंद झाले. लोणार तालुक्यात १० गावांमध्ये १३ टँकर मंजूर होते. सध्या सात गावांतील १० टँकर बंद झाले. सिंदखेड राजा तालुक्यात ३१ गावांमध्ये ३३ टँकर मंजूर होते. त्यापैकी सध्या सात गावांतील नऊ टँकर बंद झाले. खामगांव तालुक्यात ४६ गावांमध्ये ४५ टँकर मंजूर होते. तर सध्या ३२ गावांतील ३२ टँकर बंद झाले. शेगांव २४ गावांमध्ये २७ टँकर मंजूर होते. सध्या ८ गावांतील ८ टँकर बंद झाले. संग्रामपूर २ गावांमध्ये १ टँकर मंजूर, मलकापूर तालुक्यात ८ गावांमध्ये आठ टँकर मंजूर होते. सध्या पाच गावांतील पाच टँकर बंद करण्यात आले. मोताळा तालुक्यात २६ गावांमध्ये २७ टँकर मंजूर होते. त्यातील तीन गावांतील तीन टँकर बंद झाले. नांदुरा तालुक्यात ३१ गावांमध्ये ३० टँकर मंजूर करण्यात आले होती. त्यापैकी ८ गावांतील ८ टँकर बंद करण्यात आले आहेत.