बुलडाणा जिल्ह्यात नागरी भागातील १४२६ हातपंप अडगळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 03:41 PM2019-05-28T15:41:51+5:302019-05-28T15:42:01+5:30
बुलडाणा: जिल्ह्यातील नागरी भागातील सुमारे सहा लाख नागरिकांची तहान भागविणयामध्ये एक दशकापूर्वी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हातपंपांची आज दुरवस्था झाली आहे.
- नीलेश जोशी
बुलडाणा: जिल्ह्यातील नागरी भागातील सुमारे सहा लाख नागरिकांची तहान भागविणयामध्ये एक दशकापूर्वी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हातपंपांची आज दुरवस्था झाली असून याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान भुगर्भातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा झाल्यान यातील बहुतांश हातपंप कोरडे पडले आहे. परिणामी नागरिकांनी त्यांचा वापर करणे बंद केल्याने हे हातपंप कायमचे विस्मरणात जाण्याच्या मार्गावर आहे. ग्रामीण भागातील बहुतांश हातपंपांचीही हीच स्थिती आहे.
दरम्यान, काही ठिकाणीतर हे हातपंप पूर्णत: जमीनत गाडल्या गेल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत जिल्हा परिषद आणि पालिकांचा देखभाल दुरुस्ती करणारा विभाग नेमके करतो तरी काय?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरी भागातील पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात एकमेव मलकापूर पालिकेने १२० पैकी ९८ हातपंप सुस्थितीत असल्याची लिखीत स्वरुपात माहिती दिली आहे. मात्र उर्वरित १२ पालिकांनी त्याचा विसर पडल्याचे चित्र आहे.
१९८० च्या दशकात टंचाईवर मात करण्यासाठी प्रामुख्याने गावोगावी, शहरांमध्ये विंधन विहीरी घेऊन हातपंप बसविण्याचे एक मोठे फॅडच आले होते. साधारणत: २५० लोकसंख्येचा विचार करून हे हातपंप तेव्हापासून देण्यात येत आहे. अगदी आमदार निधी, जिल्हा परिषद सदस्यांना मिळणारा निधी, खासदार निधीचा यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर झाला होता. मात्र ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ अशा भूमिकेतून नागरिकांसोबतच प्रशासनानेचही या हातपंपांकडे दुर्लक्ष झाले आहे. बंद पडलेल्या या हातपंपाच्या माध्यमातून २०० फुटाखालील अॅक्वीफोर अर्थात जलधर खडक रिचार्ज करण्याचा प्रयत्नही प्रशासकीय पातळीवर किंवा सामाजिकस्तरावर दिसून आलेला नाही. एक प्रकारे जलसाक्षरेबाबतची संशोधक वृत्तीच आज नष्ट होऊ पाहते की काय? अशी स्थिती निर्माण होऊ पाहत आहे. कधी काळी याच हातपंपांनी शहरी तथा ग्रामीण भागातील अख्ख्या गावाची तहान भावगली होती. मात्र घटता भूजलस्तर पाहता हे हातपंप आज अडगळीत पडले आहे. तसे पाहता यासाठी झालेला कोट्यावधी रुपयांच्या खर्चाचीही सध्या यंत्रणेला जाण राहलेली नाही. गेल्या दोन दशकामध्ये अगदी गल्ली बोळात हातपंप घेण्यात आले होते. मात्र आज घरपोच आरोचे पाणी पोहोचत असल्याने हातपंप अडगळीत पडले आहेत.
बोअर घेताना २०० फुटांची मर्यादा
वास्तविक बोअर घेताना शासनाने २०० फुटांची मर्यादा घालून दिलेली आहे. शासकीय यंत्रणा हा नियम पाळत असल्या तरी खासगीस्तरावर त्याबाबत फारसे नियंत्रण नाही. त्यामुळे अशा हातपंपांजवळ खासगी व्यक्तीने घेतलेला बोअर हा अडीशे ते साडेतीनशे फुटापर्यंत घेतल्या जातो. परिणामी जमिनीखालील जलधर खडकातील ( अॅक्वीफोर) संपूर्ण पाणी खेचल्या जाते आणि भूजल पातळी खालावते. दुसरीकडे शासकीयस्तरावरून घेण्यात आलेले बोअर हे २०० फुट खोलीची मर्यादा आणि महिलांची पाणी हापसण्याची शारीरिक क्षमता विचारा घेऊन मर्यादी स्वरुपातच खोल घेतल्या गेलेले आहेत असे भुजल सर्व्हेक्षण विभागातील सुत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे उन्हाळ््यात बहुतांश हातपंप कोरडे पडून नंतर त्यांचा वापर होणेच बंद होते.
जिल्हा परिषदेतंर्गत ग्रामीण भागातील हातपंप सुरळीत सुरू आहेत. काही ठिकाणी अडचण असल्यास तक्रार प्राप्त होताच ते सुरळीत करण्यात येतील. जेथे पाणीच उपलब्ध नाही तेथे समस्या राहू शकते
- मोहन भट
उपयभियंता, यांत्रिकी विभाग, जि.प. बुलडाणा.
भिलवाडा परिसरातील पाच हातपंप सुरू केले आहेत. काही भागातील जुने हातपंप बंद झालेले आहेत. मात्र तक्रार प्राप्त झाल्यास त्यांची दुरुस्ती केली जाईल.
- राहूल मापारी,
पाणीपुरवठा अभियंता,
नगर पालिका, बुलडाणा.