६० ग्रामपंचायतींतील ५५८ पैकी १४३ उमेदवार अविरोध !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:53 AM2021-01-08T05:53:04+5:302021-01-08T05:53:04+5:30
चिखली तालुक्यातील एकूण ६० ग्रामपंचायतींच्या २०२ प्रभागांमधील ५५८ जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे छाननी व माघारीनंतर ...
चिखली तालुक्यातील एकूण ६० ग्रामपंचायतींच्या २०२ प्रभागांमधील ५५८ जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे छाननी व माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण ३६१ उमेदवारांनी माघार घेतली असल्याने आता ५५८ जागांसाठी १ हजार ११८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका वैयक्तिक व्देष, राग, मत्सर आदींवर लढविल्या जातात. यामुळे गावातील एकोपा, बंधुभाव, प्रेम, आपुलकी लुप्त होण्याचा धोका पाहता गावपुढाऱ्यांनी अविरोध पर्यायावर सहमती दर्शवली. त्यामुळे एकूण ५५८ पैकी १४३ जागांसाठी प्रत्येक एकच वैध नामनिर्देशनपत्र शिल्लक राहिल्याने या १४३ उमेदवारांची अविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले.
पाच ग्रामपंचायती अविरोध
वादविवाद व विकोपाला मूठमाती देऊन बंधुत्वाची नाती घट्ट विणण्यासाठी अविरोध ग्रामपंचायतीचा पर्याय तालुक्यातील पाच गावांनी निवडला. यामध्ये सात सदस्यसंख्येच्या मालगणी, खोर, मलगी, तर ९ सदस्यसंख्या असलेल्या चांधई आणि ११ सदस्यसंख्येच्या अंचरवाडी या गावाचा समावेश आहे.
१ लाच १३ हजार ५२७ मतदार
६० ग्रामपंचायतींच्या २०२ प्रभागांतील ५५८ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ६० ग्रामपंचायतींची एकूण मतदारसंख्या ही १ लाख १३ हजार ५२७ इतकी आहे. यामध्ये ५८ हजार ४४४ पुरुष, तर ५५ हजार ८३ महिला मतदारांचा समावेश आहे.
७ ग्रामपंचायतींना प्रत्येकी २१ लाख रुपयांचा निधी
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनी या निवडणुकीच्या अनुषंगाने अविरोध ग्रामपंचायतींना गावातील विकासकामांसाठी आमदार निधीतून प्रत्येकी २१ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. या आवाहनला सात ग्रामपंचायतींनी प्रतिसाद दिला. मतदारसंघातील मालगणी, खोर, अंचरवाडी, मलगी, चांधई, पळसखेड भट आणि सिंदखेड या गावांना आमदार महाले यांच्याकडून २१ लाखांचा अतिरिक्त विकास निधी मिळणार आहे.