१७ वर्षात १४७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या!
By admin | Published: May 19, 2017 12:33 AM2017-05-19T00:33:45+5:302017-05-19T00:33:45+5:30
सततची नापिकी, बँकांचे कर्ज, सावकारी कर्जाला कंटाळून आत्महत्या
अमोल ठाकरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर: पावसाची अनियमितता, सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून १७ वर्षात संग्रामपूर तालुक्यातील १४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा आत्महत्येचा आलेख चढताच असून, यावर शासनाकडून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना होत नसल्यामुळे तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढतच असल्याचे चित्र शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे.
दरवर्षी शेतकरी हा पावसाळ्याला सुरुवात झाली की मोठ्या आशेने संपूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन करून महागडे बी-बियाणे व रासायनिक खते खरेदी करतो. हे महागडे बी-बियाणे व रासायनिक खते खरेदी करण्याकरिता तो बँकांकडून पीक कर्ज तसेच बँकांकडून शेतीवर कर्ज काढतो. या महागड्या बियाण्याची पावसाच्या आशेवर पेरणी ही करतो; मात्र पेरणी आटोपल्यानंतर पावसाचे पाणीच महिना दीड महिना हजेरी लावत नाही. परिणामी शेतीत टाकलेले महागडे बी-बियाणे कोमेजून जाते व शेतकऱ्यांची निराशा होते.
मात्र तरीही शेतकरी निराश न होता घरातील आपल्या अर्धांगिनीचे दागदागिने व घरातील सोने तसेच सावकाराकडून कर्ज काढून परत नव्या जोमाने शेतात पेरणी करतो; परंतु दुबार पेरणी झाल्यानंतर पिकांना अपेक्षित असलेला पाऊस होत नाही. त्यामुळे शेतातील पिकांची वाढ खुंटते व त्यामुळे शेतकऱ्याला शेतीमधून अपेक्षित उत्पन्न होत नाही. शेतीतून मिळालेले उत्पन्न हे अल्प असल्यामुळे व पिकांपासून मिळालेले उत्पादन हे कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडून जाते.
शेतीमधून मिळालेल्या तोकड्या उत्पन्नामधून त्याला घरातील मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण, बँकाचे कर्ज, सावकारीचे कर्ज व घरातील गहान ठेवलेले दागदागिने तसेच दैनंदिन गरजा पूर्ण करणे होत नाही परिणामी शेतकऱ्यांना निराश व्हावे लागते. तसेच या दुष्काळी काळात शासनाकडूनही शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. त्यामुळे शेवटी शेतकऱ्याला मृत्यूच्या दारात उभे राहून आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागत आहे.
संग्रामपूर तालुक्यात सन २००३ पासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. तालुक्यात सन २००१ पासून ते एप्रिल २०१७ पर्यंत या १७ वर्षात एकूण १४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असून, यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सन २०१५ मध्ये झालेल्या आहेत. २०१५ मध्ये २३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद तहसील कार्यालयातील आपत्ती विभागामध्ये आहे.
दरम्यान, या १४७ शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांपैकी फक्त ६९ शेतकरी आत्महत्या शासकीय मदतीस पात्र ठरल्या आहेत. शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण बघता शासनाने यावर उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.