बुलडाणा तहसिल कार्यालयातील १५ जण कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 11:16 AM2021-03-08T11:16:37+5:302021-03-08T11:16:54+5:30
Coronavirus News १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
बुलडाणा: चार दिवसापूर्वी बुलडाणा तहसिल कार्यालयातील तीन जण कोरोना बाधित आढळून आल्यानंतर कार्यालयातील सर्वांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यामध्ये ७ मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान अद्यापही काही जणांचे अहवाल येणे बाकी असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.बुलडाणा तहसिल कार्यालयातील तीन जण यापूर्वी पॉझिटिव्ह आले होते. याची माहिती कळताच तहसिल कार्यालयात शुकशुकाट निर्माण झाला होता. त्यानंतर आरोग्य विभागाच्या एकापथकाने तहसिल कार्यालय गाठत कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी असे जवळपास ५५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. यातील काहींना आधीच कोरोनाची लक्षणे दिसून येत होते. दरम्यान ७ मार्च रोजी रात्री या तपासणीचा अहवाल आला. त्यात एकाच वेळी तब्बल १५ जण कोरोना बाधीत आढळून आल्याने शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगदरम्यान याचे लोण आणखी किती वाढते याबाबत तुर्तास बोलणे योग्य होणार नाही. मात्र जे कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले आहेत त्यांच्या कुटुंबियांचेही आता स्वॅब घ्यावे लागणार आहे. त्यामुळे हा आकडा प्रत्यक्षात किती वाढतो हे तुर्तास सांगणे शक्य नाही. अद्यापही काही कर्मचाऱ्यांचे अहवाल येणे बाकी असल्याचे सुत्रांनी सांगितले.