पंचायत समितीकडे थकले शेतकर्यांचे १५ लाख रुपये
By Admin | Published: September 7, 2014 12:31 AM2014-09-07T00:31:29+5:302014-09-07T00:31:29+5:30
अधिग्रहीत जलस्त्रोताच्या मोबदल्याचे चिखली पंचायत समितीकडे १५ लाख ५0 हजार रुपये थकले आहेत.
बुलडाणा : पाणीटंचाईच्या काळात ज्या शेतकर्यांच्या विहिरी व बोअर प्रशासनाने अधिग्रहित केल्या त्यांचा मोबदला अद्याप लाभार्थ्यांना मिळाला नसून, चिखली पंचायत समितीकडे १५ लाख ५0 हजार रुपये थकले आहेत. सन २0१२-१३ मधील पाणीटंचाईच्या काळात चिखली तालुक्यात शेतकर्यांच्या १२0 विहिरी व बोअर प्रशासनाने अधिग्रहित केले होते. ऐन उन्हाळ्यात या विहिरी आणि बोअरवरून ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागविण्यात आली. संबंधित विहीर व बोअर मालकांना प्रशासनाच्या व तीने त्यांचा मोबदला देणे आवश्यक आहे; मात्र तब्बल दोन वर्ष उलटूनही शेतकर्यांचे १५ लाख ५0 हजार रुपये चिखली पंचायत समितीकडे थकले आहेत. पाणीटंचाईच्या काळात शासनाचा स्वतंत्र निधी असतो. मग हा निधी गेला कोठे, असा प्रश्न हे शेतकरी आता विचारत आहेत. या शेतकर्यांनी आता निधी तातडीने न दिल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे. दरम्यान, पंचायत समितीच्या सभापती माधुरी देशमुख यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. सदर थकबाकी तातडीने शेतकर्यांना द्यावी, अशी मागणी सभापती माधुरी देशमुख यांनी केली आहे.