वॉटर कप स्पर्धेसाठी ‘जलयुक्त’मधून दीड लाखांची आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 03:01 PM2019-05-12T15:01:55+5:302019-05-12T15:02:02+5:30
यांत्रिकीकरणाद्वारे करावयाच्या काही कामांसाठी गावनिहाय इंधन खर्चासाठी दीड लाख रुपये जलयुक्त शिवार योजनेच्या निधीमधून देण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: राज्यात वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या व सक्रियपणे काम करणाऱ्या गावांमध्ये श्रमदानाव्यतिरिक्त यांत्रिकीकरणाद्वारे करावयाच्या काही कामांसाठी गावनिहाय इंधन खर्चासाठी दीड लाख रुपये जलयुक्त शिवार योजनेच्या निधीमधून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
या संदर्भाने मृत व जलसंधारण विभागाने दहा मे रोजीच अनुषंगिक आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील बुलडाणा जिल्ह्यासह प्रामुख्याने २४ जिल्ह्यात सुरू असलेल्या वॉटरकप स्पर्धेच्या कामांना वेग मिळणार आहे. मृत व जलसंधारण विभागाचे अवर सचिव नाईक यांनीच अनुषंगिक आदेश काढला आहे.
२०१९ मध्ये राज्यातील उपरोक्त २४ जिल्ह्यामध्ये वॉटर कप स्पर्धेची कामे सध्या जोमात सुरू आहेत. सोबतच यंदा स्पर्धेच्या कालावधीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचाही हुरूप वाढला आहे. एकट्या बुलडाणा जिल्ह्यातील १४१ गावांत कामांनी वेग घेतला असून, त्यातल्या त्यात ४१ गावांतील कामे अधिक दर्जेदार पद्धतीने होत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
अशा गावांमध्ये मृद व जलसंधारणाची दुष्काळ प्रतिबंधक उपाययोजनांची कामे श्रमदानाद्वारे करतील अशा गावांना प्रोत्साहन म्हणून मशीनद्वारे करण्यात येणाºया कामाकरिता इंधनाचा खर्च म्हणून प्रती गाव दीड लाख रुपये निधी जलयुक्त शिवार अभियानातून चालू आर्थिक वर्षासाठी देण्यात येणार असल्याचे एसएओंनी सांगितले.
जलयुक्त शिवार योजनेचा आधार मिळाल्यामुळे वॉटर कप स्पर्धेला गती मिळणार आहे. श्रमदानाला आर्थिक मदतीची जोड मिळाल्यामुळे शेवटच्या टप्प्यात नागरिकांचा सहभाग वाढणार आहे.