दीडशे कोटींचा प्लॉट खरेदी- विक्री घोटाळा : तलाठ्याच्या कारनाम्यावर वरिष्ठांचे पांघरूण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 02:17 PM2019-12-24T14:17:51+5:302019-12-24T14:17:56+5:30
घोटाळा उघडकीस आल्यानंतरही महसूलच्या बड्या अधिकाऱ्यामार्फत याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अनेकांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: मुळ मालक बदलवून खामगावात शंभरपेक्षा जास्त जणांची फसवूणक करण्यात आली. तलाठ्याच्या प्लॉट खरेदी-विक्रीच्या घोटाळ्यावर वरिष्ठांचे ‘पांघरूण’ असल्याचे दिसून येते. घोटाळा उघडकीस आल्यानंतरही महसूलच्या बड्या अधिकाऱ्यामार्फत याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अनेकांची फसवणूक झाल्याची चर्चा आहे.
खामगाव भाग- १ चा तलाठी राजेश चोपडे याने शहरातील मोक्याच्या आणि महागड्या जागांचा शोध घेतला. त्यानंतर मयत झालेल्या, बाहेरगावी असलेल्या मालमत्तांचे मुळ मालक बदलवून त्यांचे प्लॉट परस्पर विकले. याचा महसूल कार्यालयात भंडाफोड झाल्यानंतर एक बडा अधिकारी तलाठी चोपडेंना पाठीशी घालित राहीला. चोपडेकडे अंगुलीनिर्देशक करणारे मंडळ अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी सदैव महसुल विभागाच्या या बड्या अधिकाºयाच्या रडारवर राहीले.
ठराविक दलालामार्फतच प्लॉटची विक्री!
मुळ मालक बदलविल्यानंतर प्लॉटची खरेदी-विक्री करताना तलाठी चोपडे हा काही ठराविक दलालांचीच निवड करायचा. यातील एका विश्वासू दलालाने कमी किंमतीत प्लॉट उपलब्ध करून देण्याचे आमिष देत अनेकांना गंडा घातला. फसवणूक झालेल्यांची संख्या ही शंभरावर गेली असून चोपडेच्या मर्जीतील एका विश्वासू दलालाने २५ पेक्षा अधिक जणांना गंडा घातला आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये शेगाव रोडवरील प्लॉट धारकांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते.
वरिष्ठांच्या मर्जीनेच चोपडेची विदेशवारी!
अनेकांना गंडा घालून सद्यस्थितीत निलंबित आणि फरारी असलेल्या तलाठी राजेश चोपडे याची विदेशवारीही चर्चेत आली आहे. सन २०१७ ते २०१९ या कालावधीत तलाठी चोपडे याने केलेल्या विविध विदेश वाऱ्यांचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. वरिष्ठांच्या परवानगीशिवाय विदेश वाºया केल्याच कशा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.