बिरसिंगपूर येथे १५० घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:34 AM2021-04-11T04:34:04+5:302021-04-11T04:34:04+5:30
महिनाभरापासून पाणीपुरवठा बंद अवस्थेत बुलडाणा : शहराला लागून असलेल्या कोलवड ग्रामपंचायतीच्या नळ योजनेच्या विहिरीवरील विद्युत पुरवठा एका महिन्यापासून खंडित ...
महिनाभरापासून पाणीपुरवठा बंद अवस्थेत
बुलडाणा : शहराला लागून असलेल्या कोलवड ग्रामपंचायतीच्या नळ योजनेच्या विहिरीवरील विद्युत पुरवठा एका महिन्यापासून खंडित करण्यात आला आहे. तब्बल महिनाभरापासून पाणीपुरवठा बंद आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दुखणे अंगावर काढू नका
देऊळगावराजा : तालुक्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. सर्दी, खोकला, ताप अंगदुखी असे लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी तत्काळ जवळच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये चाचणी करून घ्यावी. लक्षणे अंगावर काढू नये, असे आवाहन तहसीलदार डॉ. सारिका भगत यांनी केले आहे.
लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी
बुलडाणा : शासन व प्रशासनाने घेतलेला लॉकडाऊनचा निर्णय हा चुकीचा नसून तो योग्यच आहे. परंतु या निर्णयात दुकानदार, व्यापारी वर्गाचा कुठलाच विचार करण्यात आला नाही. त्यामुळे व्यावसायिकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊन शिथील करण्याची मागणी छत्रपती शिवाजी स्वराज्य विचार मंचने केली आहे.
वन विभागाच्या जंगलाला आग
बुलडाणा : शहरातील क्रीडा संकुलमागे असलेल्या वन विभागाच्या जंगलाला ७ एप्रिल रोजी अचानक आग लागली. ही आग सायंकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी लहान झुडपाच्या सहाय्याने ही आग विझवली.
तो निर्णय मागे घेण्याची मागणी
बुलडाणा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांच्याच पदोन्नतीच्या समप्रमाणात सेवाज्येष्ठतेनुसार मागासवर्गीयांना ही पदोन्नती देण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्सने केली आहे.
आरटीईची अर्जाची तारीख वाढवा
बुलडाणा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक पालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत २५ टक्के आरक्षित जागांसाठी अर्ज भरता आले नाही. यामुळे अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी पालकांच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अवेळी पावसाचा बियाण्यावर परिणाम
बुलडाणा : सोयाबीन पिकाला मागील खरीप हंगामात अवेळी पावसामुळे मोठा फटका बसला. त्यामुळे सोयाबीन बीजोत्पादन प्लान्टची गुणवत्ता खराब झाली आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी स्वतः घरीच तयार केलेले बियाणे उगवण क्षमता तपासणी करूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
रुग्णांसाठी केली बेडची व्यवस्था
बुलडाणा : कोरोनाचा वाढता उद्रेक जिल्हा प्रशासनाची चिंता वाढवत असून प्रशासनाची प्रचंड दमछाक होत आहे. सध्या रुग्णांना बेड मिळणे दूरापास्त झाले आहे. यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी अतिरिक्त बेडचा शोध घेऊन रुग्णांसाठी बेडची व्यवस्था केली.
दे. घुबे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
बुलडाणा : कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे डॉ. बााबसाहेब आंबेडकर जयंती उत्सव सप्ताहानिमित्त ११ एप्रिल रोजी देऊळगाव घुबे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी रक्तदानासाठी समोर यावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
जागतिक आरोग्य दिन उत्साहात
हिवरा आश्रम : येथील विवेकानंद आश्रमात जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते उपस्थित होते. आश्रमाने आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामाविषयी माहिती देण्यात आली.
दस्त नोंदणीकरीता चाचणी आवश्यक
बुलडाणा : दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या पक्षकारांकडे कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक असणे गरजेचे आहे. अहवाल देण्यात पक्षकार नकार देत असतील तर त्यांना कार्यालयात प्रवेश देण्यात येणार नाही. यामुळे अहवाल घेऊनच कार्यालया प्रवेश करण्याचे आवाहन सहजिल्हा निबंधकांनी केले आहे.
कोलवड येथे लसीकरणास प्रारंभ
बुलडाणा : येथून जवळच असलेल्या कोलवड येथे लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे. मराठी प्राथमिक शाळेत शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन बी. टी. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांनी लसीकरण करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.