जळगाव जामोद तालुक्यातील १५०० शेतकरी राबविणार 'स्मार्ट कॉटन'चा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 06:42 PM2021-05-27T18:42:52+5:302021-05-27T18:43:35+5:30

Agriculture News : जळगाव तालुक्‍यातील १३ गावांमधील १५०० शेतकरी "एक समूह एक वाण"चा प्रयोग राबविणार

1500 farmers in Jalgaon Jamod taluka will implement 'Smart Cotton' experiment | जळगाव जामोद तालुक्यातील १५०० शेतकरी राबविणार 'स्मार्ट कॉटन'चा प्रयोग

जळगाव जामोद तालुक्यातील १५०० शेतकरी राबविणार 'स्मार्ट कॉटन'चा प्रयोग

googlenewsNext

- नानासाहेब कांडलक
जळगाव जामोद : महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यात यावर्षी कापूस मूल्य साखळी विकास उपप्रकल्प (स्मार्ट कॉटन) राबविल्या जात आहे.त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश असून जिल्ह्यातील जळगाव जामोद व देऊळगाव राजा या दोन तालुक्यांचा समावेश यात करण्यात आला आहे.जळगाव तालुक्यातील 13 गावांमधील 1500 शेतकरी तीन हजार एकर शेतीवर स्मार्ट कॉटनचा प्रयोग राबविणार आहे.
                  राज्यातील कापूस मूल्य साखळी ही जागतिक मूल्य साखळीशी स्पर्धाक्षम नाही.कारण राज्यातील कापूस एकजिनसी व स्वच्छ नसल्याने कापसाची प्रत घसरते.त्यामुळे कापसाला अपेक्षित भाव मिळत नाही तसेच कापसाच्या मूल्य साखळीत प्रक्रियेनंतर रुई आधारित बाजार व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग नसल्याने एकजिनसी व स्वच्छ कापूस उत्पादन केले तरी शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत नसल्याने शेतकरी या बाबीकडे लक्ष देत नाही.यावर पर्याय म्हणून यावर्षी पासून राज्यात "स्मार्ट कॉटन" हा उपप्रकल्प राबविण्यात येत आहे.जळगाव तालुक्यातील 13 गावांमध्ये या प्रकल्पाची तयारी सुरू असून यामध्ये पंधराशे शेतकऱ्यांची तीन हजार एकर शेती समाविष्ट करण्यात येणार आहे.


"एक समूह एक वाण" प्रयोग राबविणार
"स्मार्ट कॉटन" उपप्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सहभागी शेतकऱ्यांना एकजिनसी व स्वच्छ कापूस जिनिंगला द्यावा लागणार आहे.जिनिंग मध्ये त्याच्या वेगळ्या गाठी तयार करण्यात येईल आणि त्याची जागतिक बाजारात विक्री झाल्यानंतर त्यावर मिळणाऱ्या नफ्याचा हिस्सा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.या प्रकल्पात "एक समूह एक वाण" ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याने प्रत्येक समूहातील शेतकऱ्यांना एकाच जातीच्या कापसाची पेरणी करावी लागणार आहे.

तेरा गावांमधील पंधराशे शेतकऱ्यांचा समावेश
 तालुक्यातील अकोला खुर्द,वडगाव पाटण, झाडेगाव,वडशिंगी,भेंडवळ खुर्द,सातळी,गाडेगाव बु.,गाडेगाव खुर्द,भेंडवळ बु.,कुरणगाड खुर्द,निंभोरा खुर्द,खेर्डा खुर्द व पळसखेड या 13 गावांचा "स्मार्ट कॉटन" उपप्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. वडशिंगी,गाडेगाव बु. भेंडवळ बु. व खेर्डा खुर्द येथील प्रत्येकी 150 शेतकऱ्यांचा समावेश असून इतर गावातील शंभर शेतकरी यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडील फक्त दोन एकर शेती या "स्मार्ट कॉटन" प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे.म्हणजे पंधराशे शेतकऱ्यांच्या तीन हजार एकर शेतीचा या प्रकल्पात समावेश असेल. या कापसाच्या जिनिंगसाठी श्री सुपो जिनिंग-प्रेसिंगची निवड करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हा प्रकल्प राबविणार आहे.

Web Title: 1500 farmers in Jalgaon Jamod taluka will implement 'Smart Cotton' experiment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.