पहिल्या टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यासाठी लसीचे १५ हजार डोस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 11:38 AM2020-12-14T11:38:18+5:302020-12-14T11:40:45+5:30

Corona Vaccine News उणे २० अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात लस ठेवण्यासाठी आवश्यक ७० फ्रीजर उपलब्ध आहेत. 

15,000 doses of vaccine for Buldana district in the first phase! | पहिल्या टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यासाठी लसीचे १५ हजार डोस!

पहिल्या टप्प्यात बुलडाणा जिल्ह्यासाठी लसीचे १५ हजार डोस!

googlenewsNext
ठळक मुद्दे जिल्ह्यात उणे २० अंश सेल्सिअसपर्यंतची लस साठविण्याची यंत्रणा आहे. लसीकरणासंदर्भाने जिल्हास्तरावर टास्कफोर्स स्थापन आहे.  

लाेकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा:  कोरोनाची लस ही अंतिम टप्प्यात असून, बुलडाणा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात जवळपास १५ हजार लसीचे डोस येण्याची शक्यता आरोग्य विभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. 
याबाबत स्पष्ट सूचना नसल्या तरी आरोग्य विभागातील शीतकरण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, बुलडाणा जिल्ह्यात उणे २० अंश सेल्सिअसपर्यंतची लस साठविण्याची यंत्रणा आहे. नोव्हेंबर महिन्यातच जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील शीतकरण यंत्रांची तपासणी करण्यात येऊन त्यांची सज्जता ठेवण्यात आली आहे. लसीकरणासंदर्भाने जिल्हास्तरावर टास्कफोर्स स्थापन आहे.  
२ ते ८ अंश सेल्सिअस दरम्यानची लस साठविण्याची उत्तम क्षमता आरोग्य विभागाकडे असून, उणे २० अंश सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात लस ठेवण्यासाठी आवश्यक ७० फ्रीजर उपलब्ध आहेत. 


शीतगृहांची सज्जता
जिल्हा परिषद व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या अधिनस्त असलेली शीतकरण साखळीतील उपकरणे तपासण्यात आली आहे. त्यांची सज्जता ठेवण्यात आली असून, ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील ही उपकरणे सुस्थितीत आहे. प्रसंगी लसीसाठी स्वतंत्र उपकरणे घ्यावी लागल्यास तशा सूचना वरिष्ठ पातळीवरून प्राप्त होतील, असे सूत्रांनी सांगितले.


व्हॅक्सिन कॅरिअरचीही आहे सुविधा
जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर व्हॅक्सिन कॅरिअरचीही सुविधा आहे. एमआर कॅम्पेन व पोलिओ लसीकरणासाठी त्याचा यापूर्वी वापर झालेला आहे. मात्र कोरोना लसीकरण मोहीम ही आतापर्यंतची सर्वात मोठी लसीकरण मोहीम राहाणार असून, हे काम सुरू होईल तेव्हा संपूर्ण आरोग्य यंत्रणा फक्त लसीकरणाच्याच कामात गुंतेल.

आठ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम लस 
जिल्ह्यातील आठ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथमत: ही लस देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने  पहिल्या टप्प्यात १५ हजार डोस येण्याची शक्यता असून, याबाबत वरिष्ठस्तरावरून अद्याप स्पष्ट सूचना आलेल्या नाहीत. दोन कोरोनाच्या लसी असू शकतात. वरिष्ठस्तरावरून सूचना आल्यानंतर त्याची स्पष्टता होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.


व्हॅक्सिन व्हायल निरीक्षण महत्त्वाचे
कोल्ड चेन ब्रेक झाल्यास व्हॅक्सिन बॉटलवर असलेल्या व्हॅक्सिन व्हायल मॉनिटरचा (बॅच) रंग बदलतो. तसे झाल्यास संबंधित व्हॅक्सिन हे उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे ते देण्यात येत नाही. परिणामी शीतकरण यंत्रणा या लसीकरण मोहिमेत केंद्रस्थानी राहणार आहे.

Web Title: 15,000 doses of vaccine for Buldana district in the first phase!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.