बुलडाणा जिल्हय़ात सापडले १६ ब्लॅक स्पॉट; उपाययोजनांसाठी अंदाजपत्रकांचा सोपस्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:50 AM2018-01-31T00:50:53+5:302018-01-31T00:52:17+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात वर्षभरात झालेल्या ६00 अपघातानंतर परिवहन, पोलीस आणि बांधकाम विभागाने केलेल्या पाहणीत अपघातांना कारणीभूत ठरणारे १६ ब्लॅक स्पॉट शोधण्यात यश आले असून, जीओ टॅगिंगद्वारे या अपघातप्रवण स्थळांचे अक्षांश आणि रेखांशही मिळविण्यात आले आहे. दरम्यान, अपघात रोखण्यासाठी या स्थळांवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्गाच्या उपविभागाकडून अंदाजपत्रके मागविण्यात आली आहेत. 

16 black spots found in Buldhana district; Estimates for Budgets for Measures! | बुलडाणा जिल्हय़ात सापडले १६ ब्लॅक स्पॉट; उपाययोजनांसाठी अंदाजपत्रकांचा सोपस्कार!

बुलडाणा जिल्हय़ात सापडले १६ ब्लॅक स्पॉट; उपाययोजनांसाठी अंदाजपत्रकांचा सोपस्कार!

Next
ठळक मुद्दे६00 अपघातानंतर जीओ टॅगिंगद्वारे शोध

नीलेश जोशी। 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात वर्षभरात झालेल्या ६00 अपघातानंतर परिवहन, पोलीस आणि बांधकाम विभागाने केलेल्या पाहणीत अपघातांना कारणीभूत ठरणारे १६ ब्लॅक स्पॉट शोधण्यात यश आले असून, जीओ टॅगिंगद्वारे या अपघातप्रवण स्थळांचे अक्षांश आणि रेखांशही मिळविण्यात आले आहे. दरम्यान, अपघात रोखण्यासाठी या स्थळांवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्गाच्या उपविभागाकडून अंदाजपत्रके मागविण्यात आली आहेत. 
जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाच्या २८ ऑक्टोबर २0१५ च्या पत्रकातील नमूद केलेल्या व्याख्येनुसार हे ब्लॅक स्पॉट जीओ टॅगिंगद्वारे शोधण्यात आले आहे. रस्त्याच्या साधारणत: ५00 मीटर लांबीच्या तुकड्यात मागील तीन वर्षात पाच रस्ते अपघात झाले आहेत आणि त्यात व्यक्ती जखमी किंवा मृत झाला आहे, असे ठिकाण किंवा मागील तीन वर्षात रस्ते अपघातामध्ये दहा व्यक्ती मरण पावल्या आहेत, अशा निकषांवर हे स्पॉट ठरविण्यात आले आहेत. आता अपघाताची कारणे शोधून त्याच्या निवारणासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांबाबत प्रभावी हालचालींची गरज आहे. आठ दिवसात रस्ते अपघाताच्या मालिकेत सहा जणांचा बळी व २८ जण जखमी झाल्याच्या पृष्ठभूमीवर माहिती घेतली. हे १६ ब्लॅक स्पॉटचे गुपित समोर आले आहे.
रस्त्यांचा वापर करणार्‍यांमध्ये जागरुकता वाढविण्याच्या दृष्टीने खासदारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीच्या २२ जानेवारीच्या झालेल्या बैठकीत अनुषंगिक विषय छेडताना हा संपूर्ण गोषवारा मांडण्यात आला. शोधण्यात आलेले हे १६ ही ब्लॅक स्पॉट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा, राज्य महामार्ग क्रमांक १७३, प्रमुख राज्य मार्ग क्रमांक १२ आणि २७ वर सापडले आहेत. या १६ अपघात प्रवण स्थळांवर गत काळात ७२ अपघातांमध्ये ९४ लोकांचा बळी गेला असून, ८0 व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाल्या असून, २४२ व्यक्तींनाही अपघाताचा फटका बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशभर ऑक्टोबर महिन्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत असे ब्लॅक स्पॉट शोधण्यात आले आहेत. दरम्यान, स्थानिक भौगोलिक स्थितीमुळे अपघाताची कारणे वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे  अपघाताच्या कारणांचा अभ्यास करून त्याच्या निराकरणासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समिती गरज पडल्यास राष्ट्रीय किंवा राज्य सुरक्षा परिषदेलाही त्याबाबत सल्ला देऊ शकते, अशा सूचना आहेत. प्रामुख्याने ७५ टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे झाल्याचे निदर्शनास येते.

हे आहेत ब्लॅक स्पॉट
बुलडाणा बांधकाम विभागांतर्गत प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक १२ वर सावरगाव, सावखेड तेजन फाटा, मोती तलाव, राहेरी बुद्रूक (सिंदखेड राजा परिसर), राष्ट्रीय महामार्ग (अकोला बांधकाम विभाग) अंचरवाडी (देऊळगाव राजा), महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (बुलडाणांतर्गत) मेहकर तालुक्यातील बरटाळा फाटा, कॅनल पूल, नागझरी फाटा आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अमरावती अंतर्गत येत असलेल्या एनएच ६ वरील वाडी पेट्रोलपंप (मलकापूर), तरोडा फाटा, कोलारी फाटा, टेंभूर्णा फाटा (खामगाव ग्रामीण आणि खामगाव सीटी), आमसरी फाटा, चिखली (जलंब) तथा नागपूर-औरंगाबाद मार्गावरील मेहकर तालुक्यातील चांगाडी ब्रीज हे १६ ब्लॅक स्पॉट जीओ टॅगिंकद्वारे शोधण्यात आले आहे.

अपघाताची कारणे
१६ ही अपघातप्रवण स्थळी तीव्र वळण, टी पॉईंटवर गतिरोधक नसणे, तीव्र उताराचे वळण, अरुंद रस्ता, वळण आणि अरुंद रस्ता, तीव्र उतार तथा अरुंद रस्ता, तीव्र उतार आणि वळण, अरुंद रस्ता, टी पॉईंट अरुंद असणे, खामगाव शहर परिसरात वाहनांची वर्दळ आणि गर्दी ही वारंवार अपघात घडण्याची कारणे स्थळ पाहणीत समोर आली असल्याचे कागदपत्रामध्ये नमूद आहे. अशा सर्व ठिकाणी अपघातप्रवण स्थळाचे फलक लावणे, गतिरोधक उभारणे अशा उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या १६ स्थळांपैकी आठ स्थळांच्या दुरुस्तीबाबतच्या कामकाजाची मंजुरी प्राप्त झाली असून, बुलडाणा येथील कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता व राष्ट्रीय महामार्गच्या खामगाव येथील उपविभागीय अभियंत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. बुलडाणा विभागांतर्गत  २0९ किमीचे रस्ते हायब्रीड अँन्युटींतर्गत होत असून, त्यात या अपघात प्रवण स्थळांवर उपाययोजना करण्यासाठी तरतूद करण्यात आली.

 प्रत्यक्ष जीओ टॅगिंग करून हे १६ ब्लॅक स्पॉट निश्‍चित करण्यात आले आहेत. ऑक्टोबर महिन्यात परिवहन, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अपघातप्रवण स्थळांचे अक्षांश आणि रेखांश मिळवले आहेत. संपूर्ण देशपातळीवरच ही मोहीम राबविली जात आहे.
- पी. के. तडवी, 
प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलडाणा.

Web Title: 16 black spots found in Buldhana district; Estimates for Budgets for Measures!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.