पूल बांधकामाचे १६० कोटी पाण्यात!
By Admin | Published: June 13, 2017 12:19 AM2017-06-13T00:19:00+5:302017-06-13T00:19:00+5:30
नांदुरा : तालुक्यातील नांदुरा- जळगाव राज्य महामार्गावर येरळी जवळील पूर्णापात्रात चार वर्षांपूर्वी १६० कोटी रुपये खर्चून नवीन पूल बांधण्यात आला.
सुहास वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : तालुक्यातील नांदुरा- जळगाव राज्य महामार्गावर येरळी जवळील पूर्णापात्रात चार वर्षांपूर्वी १६० कोटी रुपये खर्चून नवीन पूल बांधण्यात आला. मात्र, मागील चार वर्षांपासून पोच मार्गाचे काम थंड बस्त्यात आहे. त्यामुळे किलोमीटरचा हा पूल शोभेची वस्तू झाला आहे. गेल्या चार वर्षांपासून पुलाच्या पोच मार्गाचे काम झाले नसल्याने, कोट्यवधी रुपयांचा खर्च व्यर्थ ठरला आहे.
तालुक्यातील पूर्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कालबाह्य झाला असून, पावसाळ्यात वारंवार पुराचे पाणी पुलावरून वाहून नांदुरा व जळगाव तालुक्याचा संपर्क तुटतो. त्यामुळे नवीन पुलाची मागणी होती. त्यातच जिगाव प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झाल्याने जुना पूल प्रकल्पामुळे बाधित पुलांच्या यादीत आला. त्यामुळे नवीन उंच पुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व बांधकाम विभागाच्या संयुक्त उपक्रमातून आठ वर्षांपूर्वी २००९ मध्ये पुलाचे टेंडर निघाले. त्यानुसार २०१० मध्ये पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली व ते २०१२ ला पूर्ण झाले. तेव्हापासून आज चार वर्षांचा कालावधी उलटला. मात्र, अद्यापही पोच मार्गाच्या कामाला प्रारंभ झालाच नाही. त्यामुळे पूल नदीपात्रात असताना जुन्या पुलाच्या दुरुस्तीवर लाखोंचा खर्च होत आहे.