अंजनाच्या १६७ झाडांची अवैधरीत्या कत्तल
By admin | Published: July 4, 2017 12:07 AM2017-07-04T00:07:52+5:302017-07-04T00:07:52+5:30
लाकडांचा साठा जप्त - एकाविरुद्ध कार्यवाही
लोकमत न्यूज नेटवर्क
जानेफळ : मौल्यवान अंजनाच्या झाडांची विना परवाना कत्तल करून त्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक केल्याबद्दल वन विभागाने मेहकर तालुक्यातील वरवंड येथील इसमाविरुद्ध वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अंजनाची १६७ लाकडे जप्त केली आहेत.
घाटबोरी वन परिक्षेत्रातील वरवंड नियत क्षेत्रात येणाऱ्या वरवंड गावठाण परिसरातील अंजन प्रजातीच्या १६७ झाडांची सदाशिव डवंगे रा.वरवंड याने अवैधरीत्या कत्तल करून त्याची साठवणूक केल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून वन विभागाच्या पथकाने त्याठिकाणी अचानक धाड टाकून अंजनाची १६७ लाकडे जप्त केली आहेत. यावेळी सदर लाकडे आपल्या मालकी क्षेत्रातील झाडांची असल्याचे सदाशिव डवंगे यांनी वन अधिकाऱ्यांना सांगितले. तेव्हा वन अधिकाऱ्यांनी त्यांच्या मालकी क्षेत्रात जावून पाहणी केली. दरम्यान, कत्तल केलेल्या झाडांपैकी केवळ १२ झाडांची बुंधे आढळून आली. त्यामुळे तोडलेल्या इतर झाडांच्या बुंध्याचा शोध परिसरात वन विभागाच्यावतीने सुरु असून, याप्रकरणी आरोपी सदाशिव डवंगे रा.वरवंड याच्या विरुद्ध महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९६४ चे कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वन विभागाचे अधिकारी करीत आहेत.