राष्ट्रीय महामार्गावर दोन अपघातात १७ जण जखमी, गृहरक्षकांची बस दुभाजकावर आदळली
By विवेक चांदुरकर | Published: May 22, 2024 12:21 PM2024-05-22T12:21:58+5:302024-05-22T12:22:59+5:30
पाच गंभीर जखमी
विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मलकापूर: राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी रात्री व पहाटे घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात १७ जण जखमी झाले. त्यापैकी पाच गंभीर जखमींना बुलढाणा व अकोला रेफर करण्यात आले आहे. १२ जणांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
पालघर येथील लोकसभा निवडणूक आटोपल्यावर एम.एच.१४ बी.पी.३८८२ क्रमांकाची बस गृहरक्षकांना घेवून अकोला जात होती. मंगळवारी रात्री २ वाजताच्या सुमारास भरघाव बसने राष्ट्रीय महामार्गावरील मलकापूर नजीकच्या पेट्रोल पंपाजवळ ओव्हरब्रिज वरील दुभाजकाला धडक दिली.
या अपघातात बस चालकासह १४ जण जखमी झाले. त्यापैकी गोपाल जाधव (वय २८) रा.जवळा बु.व संतोष दामोदर गणोजे (वय ४२) रा.कोळंबी मुर्तीजापूर या दोघांना पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले. उर्वरित १२ जणांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली. या प्रकरणी शहर पोलिसांनी बसचालक दीपक भाऊराव मडावी (वय ४९) रा.यवतमाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तसेच राष्ट्रीय महामार्गावरील दख्खन अॉटो सर्व्हिस सेंटर जवळ पहाटे ४ वाजताच्या सुमारास जी.जे.१८/ बी.टी.८५३८ क्रमांकाचा ट्रक व एन.एल.०१ /ए.एफ.६७०१ क्रमांकाच्या कंटेरनची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनातील मोहम्मद इकरार मोहम्मद जुबेर (वय ३८) रा.अहमदाबाद, मोहम्मद सादीक मोहम्मद नफीस (वय ४२) इलाहाबाद व अजय अमरसिंह वासकले (वय २१) रा.सेंदवा मध्यप्रदेश असे तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना बुलढाणा रेफर करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.
महामार्गाचे अपूर्ण कामामुळे घडतात अपघात
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे लोकार्पण करण्यात आले. मात्र अजूनही रेल्वे ओव्हरब्रिज निर्माणाधीनच आहे. त्यामुळे सुरू असलेल्या एकतर्फी वाहतूकीत ट्रक व कंटेनरची समोरासमोर धडक झाली. महामार्ग प्राधिकरण या विषयावर गांभीर्याने कारवाई करत नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.