१८ टक्क्याने कीटकनाशके महागली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 11:15 PM2017-09-04T23:15:48+5:302017-09-04T23:16:33+5:30
बुलडाणा: सध्या पिकांवर पडणार्या कीड व अळींना नष्ट करण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांची खरेदी करीत आहेत; मात्र जीएसटीमुळे कीटकनाशके १८ टक्क्याने महागली असून, याचा भुर्दंड सध्या शेतकर्यांना बसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: सध्या पिकांवर पडणार्या कीड व अळींना नष्ट करण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांची खरेदी करीत आहेत; मात्र जीएसटीमुळे कीटकनाशके १८ टक्क्याने महागली असून, याचा भुर्दंड सध्या शेतकर्यांना बसत आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन, कपाशी तर यासह खरीप पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकरी विविध औषधांची फवारणी करून कीड नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. पिकांवरील ही कीड नष्ट करून पिकांना वाचविण्याकरिता वेगवेगळे कीटकनाशकांच्या खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रावर गर्दी करीत आहेत. तसेच पिकांची चांगली वाढ व्हावी, यासाठीसुद्धा शेतकरी कृषी केंद्रावरून वेगवेगळे औषधे खरेदी करतात; मात्र यावर्षी १ जुलैपासून वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी शासनाने लागू केल्याने या नव्या करप्रणालीमुळे अनेक वस्तूंवरील करांमध्ये बदल झाले आहेत. या जीएसटीचा शेतीवरसुद्धा चांगलाच परिणाम झाला आहे. पूर्वी कीटकनाशकांसाठी ६ टक्के कर होता; मात्र आता जीएसटीमुळे १८ टक्के कीटकनाशकांसाठी कर लागू झाला आहे. जीएसटीमुळे कीटकनाशकांचे दर वाढले असून, याचा भुर्दंड शेतकर्यांना बसत आहे. सध्या पिकांना वाचविण्यासाठी शेतकर्यांना कीटकनाशक खरेदी महत्त्वाचे असतानाच कीटकनाशकाचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक चक्र बिघडले असल्याचे दिसून येते.
कीटकनाशके फवारणी शेतकर्यांच्या आवाक्याबाहेर
पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला असून, कीटकनाशके फवारणी अत्यंत गरज निर्माण झाली आहे; मात्र जीएसटीमुळे कीटकनाशकांचे दर १८ टक्क्याने वाढले असल्याने कीटकनाशके फवारणी सर्वसामान्य शेतकर्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. जीएसटीमुळे अनेक शेतकरी कीटकनाशके खरेदी करू शकत नाहीत. परिणामी पिकांवरील कीड नष्ट करणे शेतकर्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.