वृक्ष लागवडीतील १८ टक्के झाडे कोमेजली!

By admin | Published: May 30, 2017 12:25 AM2017-05-30T00:25:02+5:302017-05-30T00:25:02+5:30

झाडे लावा, झाडे जगवा : प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा परिणाम

18 percent of trees planted in the trees! | वृक्ष लागवडीतील १८ टक्के झाडे कोमेजली!

वृक्ष लागवडीतील १८ टक्के झाडे कोमेजली!

Next

हर्षनंदन वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शासनाच्या तीन कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्यात मागील वर्षी ३ लाख ५३ हजार ६३३ वृक्षरोपणाचे उद्दिष्ट होते; त्यापैकी २ लाख ९६ हजार १२७ वृक्ष जगले आहेत. त्याची टक्केवारी ८२.६१ टक्के असून, १८ टक्के झाडे कोमेजली आहेत. त्यात सर्वाधिक सामाजिक वनीकरण विभागाने लावलेल्या वृक्षांची संख्या आहे. यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यात यश मिळणार आहे.
झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. त्यामुळे दरवर्षी कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडतो. यासाठी शासन विविध योजनेंतर्गत ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा नारा देते. विविध योजनांच्या माध्यमातून झाडे जगविण्यासाठी प्रोत्साहन देते. याचा सकारात्मक परिणाम होत असून, मागील वर्षी शासनाच्या तीन कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत विविध विभागाने केलेल्या वृक्षरोपणातील असंख्य वृक्ष जिवंत असून, पर्यावरण संतुलन राखण्यात यश मिळत असल्याचे दिसून येत आहे.
बुलडाणा जिल्ह्याला मागील वर्षी तीन कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत ३ लाख ५३ हजार ६३३ वृक्षरोपणाचे उद्दिष्ट होते, त्यापैकी २ लाख ९६ हजार १२७ वृक्ष जिवंत आहेत. त्यात सर्वाधिक वृक्ष सामाजिक वनीकरण विभागाने लावलेल्या वृक्षांचा समावेश आहे. सामाजिक वनीकरण विभागाने लावलेल्या वृक्षांपैकी जिवंत वृक्षांची टक्केवारी ९४.५६, वन विभागाने लावलेल्या वृक्षापैकी जिवंत वृक्षांची टक्केवारी ७५.१५, परिवहन व क्रीडा विभागाने लावलेल्या वृक्षापैकी जिवंत वृक्षांची टक्केवारी ५६ व पशुसंवर्धन विभागाने लावलेल्या वृक्षांपैकी जिवंत वृक्षांची टक्केवारी ५० टक्के आहे.

यावर्षी ग्रामपंचायतींना सर्वाधिक उद्दिष्ट
राज्यात सन २०१९ पर्यंत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले असून, यावर्षी चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याला यावर्षी ८ लाख ५२ हजार वृक्ष लागवड करावी लागणार आहे. यासाठी विविध विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, सर्वात जास्त उद्दिष्ट जिल्ह्यातील ८५९ ग्रामपंचायतींना ३ लाख १५ हजार वृक्षांचे देण्यात आले आहे.

असे राहणार वृक्ष लागवडीचे नियोजन!
यावर्षी हवामान विभागाने पावसाचे चांगले संकेत दिले असून, बुलडाणा जिल्ह्यात २ जूननंतर पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार वृक्ष लागवडीसाठी प्रशासनाने विविध कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. त्यात ५ ते १५ जूनदरम्यान वृक्षारोपणासाठी खड्डे खोदणे, २३ ते २७ जूनपर्यंत वृक्षरोपाची वाहतूक करणे, २९ ते ३० जूनपर्यंत वृक्ष खड्ड्यापर्यंत पोहचविणे व १ ते ७ जुलैपर्यंत रोपे लागवड करण्याचे नियोजन केले असून, सहभागी विभागांना जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: 18 percent of trees planted in the trees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.