खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडले;४५ हजार क्युसेक वेगाने विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 11:06 AM2020-07-25T11:06:05+5:302020-07-25T11:06:26+5:30
खडकपूर्णा प्रकल्पातून २४ जुलै रोजी पहाटे ४५ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/देऊळगाव राजा: खडकपुर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा हा जवळपास ७५ टक्क्यांच्या आसपास पोहोचत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून खडकपूर्णा प्रकल्पातून २४ जुलै रोजी पहाटे ४५ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी नदी काठच्या १९ गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
१६०.६६ दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मोठ्या तीन पैकी एक प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत २७६ मिमी पावसाची नोंद झाली असून गौताळा अभयारण्यातून उगम पावणाऱ्या खडकपूर्णा नदीवरी या प्रकल्पामध्ये त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाली आहे. जुलै महिन्यात प्रकल्पाची पाणी पातळी ७० टक्क्यांच्या आसपास नियंत्रीत ठेवण्याचे निर्देश आहे. सोबतच धरण सुरक्षा नियमामध्येही तशी तरतुद असल्याने या प्रकल्पातून पाण्याचा हा विसर्ग करण्यात येत आहे. आॅगस्ट महिन्यात ही पाणीपाताळी ७५ टक्क्यावर ठेवावी लागणार आहे. मात्र आताच प्रकल्पाची पाणीपातळी ही ७५ टक्क्यांवर पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर खडकपूर्णा पूर नियंत्रण कक्षाने प्रकल्पातून पाण्यचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ वक्र दरवाजे २० सेंमीने उघडण्यात आले असून त्यातून ४५ हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.